गोष्ट एकादशीची

लहानपणी एकादशी म्हंटली की साबुदाण्याची खिचडी, पेज किंवा वरीचा भात आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच माहित होते. एकादशीचे उपवास आजी करायची त्यामुळे या पदार्थावर ताव मारण्यासाठी मी नेहमी हजर असायचो. आषाढी एकादशीच्या दिवशी आमची शाळा लवकर सुटली आणि मी आजीच्या घरी गेलो. घरात सुंदर भाजलेल्या शेंगदाण्याचा सुगंध येत होता मला कळून चुकले की आज उपवासाचे काही तरी खायला मिळणार 😋😋😋. साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता हे कळले. मी पाठीवरचे दप्तर बाजूला टाकले, आणि स्वयंपाकघरात जागा पकडून खिचडी तयार होण्याची वाट पाहू लागलो. आजी स्वयंपाक करण्यात मग्न होती आणि मी त्रास देण्यात 😈😈😈. माझा त्रास कमी व्हावा म्हणून आजीने मला विचारले एकादशीचा उपवास का करतात माहिती आहे काय? मी म्हंटले "नाही!" 😐😐😐. हे ऐकून आजी म्हणाली "शांत बस! मी तुला एकादशीची गोष्ट सांगते"....

आजी ने गोष्ट सांगायला सुरुवात केली ............................
" आपण आता कलियुगात जगतो आहोत. कलीयुगा पूर्वी सत्ययुग, त्रेतायुग, आणि द्वापारयुग होऊन गेली. सत्य युगात विष्णू देवाने ४ अवतार घेतले ते म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसींव्ह. त्रेता युगात ३ अवतार घेतले वामन, परशुराम आणि राम. द्वापार युगात एक पूर्णावतार म्हणजे कृष्णावतार आणि कली युगात २ अवतार आहेत एक बुद्ध अवतार जो झाला आणि कल्की अवतार जो कलियुगाच्या शेवटी होणार आहे." मी आपले शांत पणे ऐकत होतो. कारण वेगळे सांगायला नको 😉😉😉. आजी आपली गोष्ट सांगण्यात मग्न होती 
" सत्ययुगा मध्ये लोक खूप चांगली होती, सगळे अगदी छान चालले असायचे. सगळी लोक पुण्यवान होती कारण कुणाचीच पाप बुद्धी न्हवती. सगळी लोकं पुण्यकर्म करत असत. लोकांच्या संचयी फक्त पुण्यच असल्यामुळे पापाचं अस्तित्व राहिले न्हवते. आता हे सगळे काय आहे असा प्रश्न पडला असेल ना ? तर त्याचे असे आहे की, आपल्या आयुष्यात पापपुरुष  आणि पुण्यपुरुष असे दोन व्यक्ती अदृश्य रूपाने वावरत असतात आणि वेळो-वेळी आपल्या बुद्धीला चांगले-वाईट विचार देऊन आपल्या  हातून पाप किंवा पुण्य घडवून घेत असतात.
सत्य युगात पुण्यपुरुषाचे सगळे छान चालले होते आणि पापपुरुषाची दशा खूप वाईट झाली होती. पापपुरुषाचे जगणे खूप कठीण झाले होते. शेवटी पापपुरुषाने श्री विष्णूंची आराधना आणि तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येवर विष्णू देव प्रसन्न झाले  आणि पापपुरुषाला वरदान मागण्यास सांगितले. पापपुरुषाने मागणी केली "सत्ययुगात माझी खूप आबाळ होत आहे आणि मला जगणे कठीण झाले आहे. हे देवा मला  जगण्यासाठी लोकांच्या आयुष्यात जाण्याचे वरदान द्या".  श्री विष्णूंनी पाप पुरुषाची ही मागणी मान्य केली आणि त्याला वरदान दिले. 'हे पापपुरुषा एकादशीच्या दिवशी जो कुणी अन्न ग्रहण करेल त्या अन्नाद्वारे तू लोकांच्या आयुष्यात शिरकाव करू शकतोस आणि तुझे कार्य निर्विघ्न पणे करू शकतोस' म्हणूनच एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस अन्नग्रहण न करता लोकं उपवास करतात. म्हणून जर पुण्यवान व्हायचे असेल तर एकादशीचे उपवास करत जा !!!"

आजीने गोष्ट संपवली आणि माझी खिचडी माझ्या पुढे होती. पुढे काय? ते वेगळे लिहायला नको 😁😁😁

एकादशी बद्दल अजून थोडी माहिती:
  • एकादशी म्हणजे चांद्र दिनदर्शिकेचा ११ वा  दिवस. एका महिन्यात २ एकादशी येतात. एक कृष्ण पक्षातली आणि एक शुद्ध पक्षातील
  • एकादशी मध्ये देखील दोन प्रकारच्या एकादश्या पाळल्या जातात त्या म्हणजे स्मार्त आणि भागवत. विष्णू देवासाठी करण्यात येणारी एकादशी भागवत तर शिवा/शंकर देवासाठी करण्यात येणारी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी  होय (तिथीनुसार त्यांचे वर्गीकरण आणि नियम आहेत)
  • प्रत्येक ऋतू मधील एकादशीचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक एकादशीचे वेगळे असे नाव तर काहींचे वेगळे असे नियम देखील आहेत. उदाहरणार्थ निर्जला एकादशी, नावानेच कळेल ह्या एकादशीचा नियम पाणी देखील ग्रहण न करणे हा आहे
  • वर्षातल्या २ एकादश्या सर्वांना चांगल्याच माहिती असतील ? आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (देवउठनी किंवा प्रबोधिनी). अधिक माहिती साठी या संकेत स्थळावर क्लीक कराआषाढी किंवा देवशयनी एकादशी
  • एवढी सगळी माहिती दिली आणि "एकादशी आणि दुप्पट खाशी" बद्दल काही बोललो नाही असे कसे होईल? धान्य रुपातले अन्न व्यर्ज असल्यामुळे लोकांनी खूप काही पर्याय शोधून काढले आणि नेहमीच्या जेवणापेक्षा एकादशीच्या दिवशी जास्त खाऊ लागले आणि म्हणून ही म्हण असावी असे मला वाटते . पुढील काही संकेत स्थळावर खाण्याचे पर्याय तुम्हाला या पूर्वी आम्ही दिले आहेत ते पुढील प्रमाणे 
आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. अजून काही माहिती हवी असल्यास "Comment "करून विचारावी. धन्यवाद !!!

चंद्रभागे तीरी पंढरपूरचा रमणीय सूर्यास्त

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा - चंद्रभागे तीरी पुंडलिक मंदिर 

चंद्रभागेचे चंद्रकृती पात्र विठू माऊलीच्या देवळाचे पश्चिमदार चंद्रभागेतीरी पुंडलिक मंदिर, पंढरपूर 

।। बोला पुंडलिक वरदे ~~~ हरी विठ्ठल ।।
।।श्री ज्ञानदेव - तुकाराम ।।
।। बोला पंढरीनाथ महाराज की जय ।।

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes