थाई - थै थैयाट

आठवड्याची सुरुवात झाली आणि रोजचा दिनक्रम चालू झाला. सकाळी लवकर उठून ट्रॅफिकला चुकवून  ऑफिस आणि संध्याकाळी ट्रॅफिकमधे अडकून घरी. मित्रांसाठी वेळ म्हणजे व्हाट्सअँपवर दिवसभर येणारे संदेश (Messages), या ग्रुप मधून त्या ग्रुप मध्ये "कॉपी-पेस्ट".
ऑफिस मधे रोजच्या कामात गुंग असताना भ्रमणध्वनी कंपित झाला (Cellphone Vibrate) आणि अमेरिकेच्या मित्राचा मेसेज आला "मी ऑफिस जवळ येत आहे, खाली भेट". २००७ ते २०१० या दरम्यान आम्ही अमेरिकेत एकत्र काम करायचो आणि भाड्याने खोली घेऊन एकत्र राहायचो. मित्र अमेरिकेतून इथे आला की एक भेट नक्कीच असते आणि सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. त्या काळात बर्याच गमती-जमती केल्या. पण एक गोष्ट जी नेहमी स्मरणात राहिली, ती एका थाई हॉटेलमधल्या जेवणाची...... 
अमेरिकेत सुरुवातीला सगळेच नवीन त्यात बरेच लोकं गावात वाढलेले आणि शहरात नोकरीसाठी आलेले, मुद्दा असा कि शहराचा वारा न लागलेले. असो, तर गोष्ट सुरु होते अमेरिकेच्या एका छोट्या शहरात ती म्हणजे ग्रीनविल,साऊथ कॅरोलिना (Greenville ,SC, USA) येथे. आमच्या कंपनी मधून साधारण ८ ते १० लोक ग्रीनविल येथे कामानिमित्त पाठवण्यात आली होती तर मी आणि माझा आणखी एक मित्र ह्यूस्टन, टेक्सास (Houston , TX, USA ) येथे होतो. कंपनीच्या कामानिमित्त मला ग्रीनविलला एका आठवड्यासाठी यावे लागणार होते. सगळी तयारी झाली आणि मी पहिल्यांदा ग्रीनविल येथे पोहोचलो. सगळ्यांची भेट झाली, गप्पा रंगल्या आणि सर्वानुमते दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरला. जेवायला कुठे जायचे ह्यावर चर्चा सुरूच होती आणि नेहमी भारतीय जेवण नको म्हणून थाई हॉटेल (Thai  Restaurant ) मध्ये जेवायला जाऊया असे एक मताने ठरले. ग्रीनविल थाई - म्हणून एक हॉटेल ऑफिसच्या जवळ होते तेथे जाण्याचा बेत ठरला आणि जेवण्याच्या वेळेत आम्ही तिथे पोहोचलो. हॉटेलमध्ये वाढपी (Waiter) येऊन किती लोकं आहेत हे विचारून तुम्हाला बसायची जागा दाखवतो/देतो अश्या बऱ्याच लहान सहान  गोष्टी त्या वेळेला नव्याने मला कळल्या. आमच्यामधले काही लोक अगोदर येथे येऊन गेले होते म्हणून त्यांना या लहान सहान गोष्टी आणि इथल्या व्यंजनांची माहिती होती असे मी म्हणू शकतो (मानत नाही)........ 😁😁😁

सगळा खटाटोप करून सगळे हॉटेल मध्ये स्थिरावले आता परीक्षेची वेळ झाली होती, खाण्यास काय मागवायचे ? मी या पूर्वी कधी थाई हॉटेल मध्ये जेवलो न्हवतो म्हणून आजू बाजूचे काय मागवतील ते पाहून मागवायचे असा मनसुबा होता 😁. एका मित्राने "थाई रेड करी विथ व्हाईट राईस", एकाने "पॅड-थाई नूडल्स" तर काहींनी "फ्राईड राईस" असा मेनू फायनल केला. या सगळ्यामध्ये फ्राईड राईस मला जवळचा वाटला म्हणून मी फ्राईड राईस मागवण्याचा बेत केला. आता खरी परीक्षेची वेळ आली; वेटरने तिखटपणा किती ठेवायचा हे विचारले? अगोदर येऊन गेलेल्या लोकांना थाई-१,थाई-३, अमेरिकन-५, ... असे सांगताना ऐकून मी थोडा बुचकळ्यात पडलो. तेव्हा कळले की जेवणातील तिखट इथे २० स्तरात मिळते. अमेरिकन १ ते १० आणि थाई १ ते १०. थाई -१ चा तिखट पणा अमेरिकन -१० पेक्षा १० पट जास्त असतो आणि पुढे अजून वाढत जातो अशी माहिती मिळाली. भारतीय लोकं खूप जास्त तिखट खाऊ शकतात आणि अमेरिकेत तसं सगळे जेवण गोडसर/मुळमुळीत असते याचा अनुभव मला आला होता. मला आता समजेना पण मग आजू बाजूचे काय सांगताहेत ह्यावर मी लक्ष ठेवून होतो. माझ्या एका मित्राने थाई-५ सांगितले त्याची तिखट खाण्याची ताकत माझ्या सारखी होती म्हणून मी देखील थाई-५ तिखट स्तर सांगितला. मी थाई-५ सांगितले हे ऐकून माझ्या जालनाच्या मित्राने थाई-१० रेड करी सांगितली. तिखटाचे हे स्तर ऐकून वेटर थोडी हबकली, तिने सांगण्याचा प्रयत्न केला कि हे खूप जास्त तिखट असेल पण सगळ्यांमधला भारतीय जागा झाला होता आणि अमेरिकेचे तिखट भारतीयांना काही करू शकत नाही अश्या थाटात सगळे वावरत होते. कुणी शीतपेय (Cold Drink) किंवा पाणी  मागवल्याचे मला आठवत नाही. (होय तिथे पिण्यासाठी काय हवे हे सांगावे लागते - भारतातील हॉटेल सारखे ते प्रथम पाणी आणून देत नाहीत - अजून एक गोष्ट कळली) जेवणाची वाट बघत सगळे गप्पांमध्ये गढून गेले.... 

सर्व प्रथम वेटर ने तिथले "ग्रीन सॅलड विथ हाऊस ड्रेसिंग" आणून दिले. मला तो प्रकार खूप आवडला. हळदी रंगाचे गोडसर चवीचे ड्रेसिंग, सॅलड सोबत छान लागत होते. गाजर-आलं आणि तिळाचे तेल अश्या साहित्यापासून बनवलेले ते ड्रेसिंग होते. 
ग्रीन सॅलड विथ हाऊस ड्रेसिंग
सॅलड संपते ना संपते तेवढ्यात सगळ्यांनी मागवलेली व्यंजने येण्यास सुरुवात झाली. आकर्षक पणे सजवलेल्या सुबक डिशेश सर्वांपुढे ठेवण्यात आल्या आणि प्रत्येक जण ते खाण्यासाठी उत्सुक झाला. 
फ्राईड राईस
मी फ्राईड राईसचा पहिला घास घेतला आणि माझ्या डोळ्यापुढे मिरच्या नाचायला लागल्या, अंगाला घाम फुटला, डोळे लाल झाले, नाकातून गंगा-जमुना वाहू लागल्या. पूर्ण तोंड पोळून निघाले. त्यात जेवणाच्या टेबलवर पाणी नाही किंवा शीतपेय नाही. जी काही हालत झाली होती ती शब्दबद्ध करणे खूप कठीण आहे.
मागवलेला पदार्थ ७$चा  (Rs. ३५०) असल्यामुळे टाकू देखील शकत न्हवतो. (अमेरिकेत नवीन असल्यामुळे प्रेत्येक गोष्टीची भारतीय किंमत काढून हिशोब चालायचे - जे योग्य नाही - अजून एक कळलेली गोष्ट). माझी हालत खराब होती, आजू बाजूला पहिले तर तिथेही काही वेगळी परिस्थिती न्हवती.
थाई रेड करी 
सगळी लोकं लाल झाली होती, सगळीकडे गंगा-जमुना वाहत होत्या. थाई-५ मध्ये ही हालत होती, थाई-१० वाला एव्हाना उडाला असेल म्हणून पहिले तर तो पूर्ण ताकदीनिशी ती रेड करी संपवत होता. अजून देखील त्याचा चेहरा मला चांगला आठवतो आहे. आम्ही जेमतेम फ्राईड राईस मधल्या भाज्या खाऊ शकलो बाकी काही खाता येईना. सगळ्यांचा नुसता थै-थैयाट चालू होता. हा सगळा प्रकार हॉटेल मधल्या लोकांनी पाहिला आणि हसत आम्हाला आठवण करून दिली की आम्ही बोललो होतो.... 😓 😓 😓

आम्हा कुणाला काही सुचत नसावे कारण कुणीही गोड पदार्थाची मागणी केली नाही. सर्वांची हालत बघून त्यांनीच आम्हाला "बनाना कॉईन्स" नावाचा थाई गोड पदार्थ काहीही पैसे न घेता आणून दिला. साऱ्यांनी पटापट ते बनाना कॉईन्स खाल्ले आणि झालेली आग थोडी फार शांत केली. तिथून सगळे ऑफिसला आलो आणि आपापल्या कामाला लागलो. पोटात आग जाणवत होती त्यात दिवस कसा संपला कळलेच नाही.
बनाना कॉईन्स
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ऑफिस मधे भेटले आणि पुन्हा चर्चा सुरु झाली. जी गोष्ट स्लो-मोशन (Slow Motion) मधे करता येत नाही, तेच करून बऱ्याच जणांची तब्बेत नरम होती. 
प्रश्न : काय कसे काय ?
पहिले उत्तर: सीट बेल्ट लावायला हवे होते, जवळ जवळ उडूनच गेलो होतो 😆 😆 😆
दुसरे उत्तर: आग हि आग, बे-मोसम बरसात 😌 😌 😌
काही उत्तरे इथे लिहू शकत नाही त्या बद्दल माफ़ी असावी 😎 😎 😎
थाई-१०च उत्तर ऐकण्यास सगळेच उत्सुक होते
उत्तर: काही नाही फक्त शिंतोडे शिंतोडे शिंतोडे  🙈 🙉 🙊

सगळ्यांची हालत चांगली २ दिवस नरम होती आणि अश्या रीतीने आमचा थाई थै-थैयाट संपला आणि गाठीशी तिखट आठवणी घेऊन आम्ही मार्गस्थ झालो...................!!! 


Pic Courtesy: Google

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes