एक चित्तथरारक पाठलाग

जुलै २०१०. खूप छान पाउस पडत होता. माझे गाव सफाळे अगदी नव्या नवरी सारखे हिरवा शालू नेसून पावसात चिंब-चिंब भिजत होते. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मी देखील निवांत चहा पीत पावसाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात मुंबईच्या एका मित्राचा फोन आला. 

मित्र: हेलो, कसा आहेस ? काय चालू आहे ?
मी: अरे मजेत आहे. तू बोल आज कशी काय आठवण काढलीस ?
मित्र: अरे विशेष असे काही नाही. बसलो आहे चिखल बघत !
मी: चिखल बघत ? अरे काय झाले ?  छान पाऊस पडतो आहे आणि चिखल काय बोलतोस? एवढा निराश का झाला आहेस? सगळे ठीक आहे ना?
मित्र: अरे काही नाही, गावची आठवण !!! पाउस म्हंटला कि खूप धमाल असायची गावाला. मुंबईत आलो आणि सगळा निसर्ग माझी वाट पाहत गावाकडेच  राहिला बघ :(
मी: अरे एवढेच ना ? तू पण ना , उगीच नौटंकी करतोस. गावची आठवण आली ना !!!  मी बघतो काय ते ! सोमवारी ऑफिसला भेटू.
मित्र: हा ठीक आहे, चल बाय. भेटू !!!

मी फोन ठेवला आणि मित्रांसाठी पावसाळी सहल आयोजित करण्याचा बेत आखला. सोमवारी ऑफिसमध्ये येताच माझ्या मित्रांना बेत सांगितला. सगळे एका मताने हो म्हणाले आणि पावसाळी सहलीचा आमचा बेत ठरला. माझे मुंबईचे सगळे मित्र शनिवारी रेल्वेने सफाळ्याला येतील आणि पुढे आम्ही लालठाणे गावचा धबधबा, सातिवली गावची गरम पाण्याची कुंडे, काठीयावाडी ढाब्यात जेवण आटोपून माझ्या सफाळ्याच्या घरी मुक्काम करणार. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शितला देवी देऊळ, केळवे बीच, दांडाखाडी पूल आणि शेवटी पूल नाक्यावर भुजिंग खावून स्वस्थानी प्रस्थान. असा भरगच्च बेत मी आखला होता.
वैतरणा नदीचे तुडुंब भरलेले पात्र - रेल्वेतून
ठरविल्याप्रमाणे मुंबईचे मित्र रेल्वेने सफाळ्यात आले, पाऊस मेहरबान होवून छान कोसळत होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मित्रांचे स्वागत आईने बनवलेल्या कांद्या-पोह्याने आणि गरमा गरम चहाने झाले, त्या चिंब पावसातल्या पोह्यांची सर कशालाच येणार नाही हे खरे. चहा नाश्ता झाला आणि आम्ही सगळे माझ्या टाटा इंडिगोने लालठाणे गावातील धबधब्या कडे निघालो, माझी काळ्या रंगाची टाटा इंडिगो म्हणजे  "Black Beauty" पावसात थोडी आजारी असते म्हणजे दरवाजे नीट लागत नाहीत, गाडी पटकन चालू होत नाही वैगरे वैगरे :).
आम्ही सगळे टाटा इंडीगोने धबधबा जिथे आहे त्या डोंगराजवळ पोहोचलो आणि मोबाईल फोन वैगरे गाडीत ठेवून धबधब्याला जाण्यासाठी निघालोच होतो, तेवढयात माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इंडिगोचे मागचे दरवाजे काही केल्या लागत नाहीत. सगळे मित्र खोळंबले आणि समोर दिसणाऱ्या धबधब्यामुळे जास्तीच उतावीळ झाले. शेवटी गाडीचे दरवाजे मधून दोरीने बांधले आणि पुढचे दरवाजे लॉक करून आम्ही धबधब्यासाठी निघालो.
मिशन ए धबधबा
लालठाणे धबधबा
साधारण २५-३० मिनिटे निसरड्या पायवाटेवर, ओढ्यातून पायपीट करीत आम्ही पोहचलो आणि धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यास सुरुवात केली. लागलीच पावसाने हजेरी लावली आणि आनंद द्विगुणीत झाला. मित्राने मसालेदार केळीचे वेफर आणले होते, पावसात तिखट लागणारे ते वेफर्स म्हणजे काही औरच मजा :). सगळे मित्र त्या धबधब्यात मनसोक्त भिजत होते आणि आणलेल्या खाऊचा यत्थेच स्वाद लुटत होते.

धबधब्याखाली
धबधब्याखाली
थोड्यावेळानंतर आणखीन काही लोक तिथे भिजण्यास आले आणि मला विचारले "ती खाली काळी गाडी तुमच्या पैकी कुणाची आहे का ?"  मी हो  म्हंटले आणि विचारले;  काही झाले का? त्यावर ते म्हणाले, तुमच्या गाडी मध्ये कुणीतरी आहे; तुमच्यापैकी कुणी खाली बसले आहे का? - त्या शेवटच्या "का?" ला सगळे उडाले. सगळ्यांना आता आपापले फोन, पैस्याची पाकिटे इतर मौल्यवान वस्तू दिसू लागल्या आणि जंगलातून त्या निसरड्या वाटेवरून आमचा चित्तथरारक पाठलाग सुरु झाला. जंगलातल्या निसरड्या वाटेवरून धडपडत, चीखलात माखून, शेणाने भरलेले पाय घेवून आम्ही गाडीजवळ पोहचलो. गाडीतून २ भ्रमणध्वनी (सेल फोन) आणि पैसे चोरले गेले होते. शिल्लक फोनवरून आम्ही चोरलेल्या फोनवर फोन केले पण कुणी उचलेना. फोन बंद केला नाहि म्हणजे आताच चोराला असला पाहिजे असे म्हणून आम्ही आजू बाजूला बघू लागलो. सगळ्यांचेच चेहरे उदास झाले, तेवढयात माझ्या मित्राच्या वाडीत काम करणारा एक छोटा मुलगा तिथे आला, तिथल्या लोकांची आणि जागेची त्याला नीट माहिती होती. मित्राने त्याला विचारले इथून कुणी मुलगा पळत गेला का ? त्यावर तो लगेच म्हणाला " हो - त्या पाड्यातला एक पोरगा समोरून पळत गेला".  त्या पोराने ज्या दिशेला हात दाखवला त्या दिशेला आम्ही सगळे धावू लागलो.  फोनची रिंग जाणे देखील आता बंद झाली होती कारण तो बंद करण्यात आला होता. पावसामुळे झालेल्या चिखलात  घसरत हाता-पायाला लागणाऱ्या काट्याना न जुमानतां आमचा पाठलाग त्या जंगलामध्ये चालू होता. सगळ्यांनाच आता घाम फुटला होता, ओले चिंब असून देखील सगळ्यांचे चेहरे लालबुंद झाले होते. त्या मुलाचा काही एक पत्ता लागत न्हवता. चांगला, ३० एक मिनिटे पाठलाग करून आम्ही त्या पाड्यात जाण्याचा निर्णय घेतला….
पाड्यात  येताच आम्ही  आवाज चढवून विचारपूस करण्यास सुरुवात केली.
आम्ही : कुठे आहे तो मुलगा ? आताच आमचे पैसे आणि मोबाईल चोरून तो पळाला आहे ?
(आमचा आवाज ऐकून पाड्यातील बरेच लोक बाहेर आले आणि पाड्यातील लोक आणि आमचे भांडण सुरु झाले.)
पाड्यातील लोक: तुम्ही पैसेवाली लोकं गरीबालाच चोर ठरवा !!!  आम्हाला खायला मिलत नाय म्हनजे आम्ही चोर झालो व्हय ?
आम्ही : इथल्या पोराला आम्ही बघितला आहे, त्यानेच चोरी केली आहे.
पाड्यातील लोक: आमच्या पोरांना चोर म्हणणारे तुम्ही कोन? आमची पोरां रस्त्यावर नाय पडली की कुनीबी यावं आनी चोर बोलावं!
वातावरण जरा तंग झाले, पाड्यातील लोक हमरी-तुमरी वर येवू लागले. आम्हाला आता काढता पाय घेणे गरजेचे होते. आम्ही तिथुन जोर जोरात बोलतच निघालो - "चला पोलिस स्टेशनला कम्प्लेंट करू , ह्यांना हीच भाषा कळेल". थोड्या निराशेतच सगळे तिथून निघालो……….सगळ्यांचा मुड एव्हाना बिघडला होता, वस्तू मिळण्याची काहीच चिन्हे दिसत न्हवती. थोड्या निराशेतच चालत चालत पुढे येतो न येतोच तर मागून एक माणूस हाका मारत येताना दिसला. आम्ही जरा चरकलो पण थांबलो. तो माणूस येवून बोलू लागला
"साहेब पोलिस कम्प्लेंट करू नका. पोलिसांचा लय तरास होईल बघा पाड्याला. तुम्ही जरा दमाने घ्या. पाड्यातील लोक काही बोलले ते विसरून जा. माझ्या भाच्यानेच चोरी केली आहे तुमच्या वस्तूची. त्याच्या घरी पण हा चोऱ्या-माऱ्या करतो म्हनून सुधरवायला आनला हाय बघा इथे पोराला. तुमचं सगलं समान देतो बघा परत. एक डाव माफी करा पोराला. लहान आहे. आला कि धुतो त्याला चांगला पण तुम्ही माफी करा"
माझा मित्र आशिष (दादा )म्हात्रे आणि त्याच्या
वाडीतला मुलगा परत मिळालेले फोन घेवून 
सगळ्यांनी त्याचा रडवेला चेहरा पाहिला आणि सगळे शांत झाले. त्याला नीट वागायला शिकवा अशी आम्ही तंबी दिली. आमच्या वस्तू कुठे आहेत ? असे विचारताच "पोराला फोन लावा चालू केलाय फोन त्याने. माझ्या मित्राने त्याला फोन लावला आणि सांगितले आम्ही पोलिसात जाणार नाही आमचे सामान परत दे. तेव्हा तो बोलला "तुमच्या गाडीजवळ रस्त्या-बाजूच्या जांभळा खाली ठेवतो हाय " एवढे बोलून त्याने फोन बंद केला. आम्ही त्याच्या मामाला  जोडीला घेतला आणि झाड दाखव असे सांगितले. झाडाजवळ येताच झाडा खाली प्लास्टिकची पिशवी दिसली, आम्ही लागलीच तिथे गेलो. पिशवी मधे आमचे चोरलेले फोन, पैसे सगळे होते. १० -२० रुपये कमी असावेत पण बाकी वस्तू होत्या. मित्राने बंद केलेला फोन चालू केला आणि सगळे नीट आहे असे म्हंटले. आमच्या पाठलागाचा असा गोड अंत झाला. त्याच्या मामाला आम्ही आता सुट्टी दिली आणि आमच्या पुढच्या सफरीसाठी निघालो…………सातिवली येथील गरम पाण्याची कुंड, काठीयावाडी ढाब्यात जेवण - दुसऱ्या दिवशी  केळवा फोर्ट, केळवा बीच, आई शितलामाता मंदिर, केळवे पूल नाक्यावर चीकन भुजिंग, बटाटे वडे , तृप्त सोडा असे बरेच उद्योग करून भरपूर आठवणी घेवून सगळे स्वगृही सुखरूप परतले.………
@ केळवे बीच
@ केळवा फोर्ट
टीम मिशन ए पाठलाग - फोटो सौजन्य - दादा (आशिष) म्हात्रे - पाठलागचे मुख्य अधिकारी :P


मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes