बर्फातल्या आठवणी - स्की इन आप्लेशिअन मॉउंटन

कयाकिंग करून बरेच महिने उलटले असतील, सर्व मित्रांची चुळबुळ सुरु झाली. सगळ्यांनाच आता एखाद्या मोठया सहलीचे वेध लागले होते. रोज इंटरनेटवर "Things  to  Do" शोधणे चालले होते. खूप डोकेफोड करून सगळे एका बेतावर स्थिरावले आणि १९ फेब्रुवारी २००९ साली मी आमच्या स्की (Ski) ट्रिपचा बेत अगदी खर्चासहित सगळ्यांना इमेल केला.

स्की ट्रीपचा प्लान
सगळे मित्र या सहलीच्या तयारीला लागले. या सहलीला मात्र सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बेत आखल्या प्रमाणे ह्यूस्टन (Houston, TX, USA) या शहरातून माझे ४ मित्र माझ्या ग्रीनवील येथील निवासस्थानी येण्यास निघाले आणि माझ्या इथले ४ असे एकूण ८ लोक या सहलीसाठी सज्ज झालो. बेत आखल्या प्रमाणे सर्व लोक अटलांटा इथे भेटतील आणि तिथली काही ठिकाणे पाहून ग्रीनवीलला रात्री राहण्यासाठी येतील.
कोका-कोला कंपनी कडे
ह्युस्टनची मंडळी अटलांटाला (Atlanta, GA, USA) आली आणि आमच्या सहलीला सुरुवात झाली. वातावरण थोडे ढगाळ होते पण फिरण्यासारखे होते, आम्ही अटलांटा येथील कोका-कोला कंपनीला सहलीची पहिली भेट दिली. तिथली खासियत म्हणजे जग भरात वितरीत होणारया जवळ जवळ ७० ते ८० प्रकारच्या कोकची तुम्ही चव घेऊ शकता. तिथले वस्तूसंग्रहालय पाहत पाहत आम्ही एका मोठ्या खोलीत शिरलो, तिथे मोठ्या चौकोनी खांबावर एका बाजूला ४ नळ असे एका खांबावर १६ नळ बसवले होते. प्रत्येक नळावर त्या चवीचा कोक कुठे वितरीत होतो त्या देशाचे नाव लिहिले होते. असे ५ते ६ खांब त्या खोलीत होते आणि खोलीच्या प्रत्येक बाजूला एक प्रसाधन गृह होते जेणे करून तुम्हाला कमीत कमी कष्ट होतील. आम्ही सगळे कमीत कमी २ तास वेगवेगळ्या कोकची चव घेण्यात आणि सारखी येजा करण्यात गुंग होतो :P. 
आयुष्यावर बोलू काही

कोका-कोला कंपनी पाहून झाली आणि आम्ही जगातील सगळ्यात मोठे जॉर्जिया मत्स्यालय (Georgia Aquarium) पाहण्यास गेलो. तिथला अनुभव अगदी भव्यदिव्य असाच होता. मला अमेरिकेचा हेवा वाटतो तो याच कारणामुळे, सगळे कसे नीट-नेटके आणि भव्य. असो,  हे सर्व आटोपून आम्ही ग्रीनवीलसाठी निघणार तेवढ्यात असे कळले कि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम जॉर्जिया-टेक (Georgia Institute of Technology, GA, USA) येथे आयोजित करण्यात आला आहे. आम्हाला तर सोन्याहून पिवळा असा योग समोरून चालून आला होता. सगळे खूप आनंदात त्या कार्यक्रमात सहभागी झालो. मुक्त हस्ताने टाळ्या वाजवल्या, दिल खुलास दाद दिली आणि मध्यंतरा मध्ये छान समोसे देखील हाणले. अमेरिकेत हे सगळे चालू आहे ह्याच्या आम्हाला क्षणभर विसरच पडला. दमलेल्या बाबाची कहाणी ऐकत जड अंतःकरणाने आम्ही तिथून निघालो. घरची आठवण तिथे जमलेल्या सगळ्यांनाच आली असणार कारण सगळयांचे डोळे  पाणावलेले होते. रात्री आम्ही सगळ्यांनी ग्रीनवील गाठले आणि दुसऱ्या दिवशी स्की करण्याच्या स्वप्नात गाढ झोपी गेलो.

सकाळी जाग आली तेव्हा वातावरण थोडे ढगाळ होते, इंटरनेटवर दिवसाचे वातावरण पहिले तर मेघगर्जनांसहित बर्फवृष्टी / पाऊस (Thunderstorm)  होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सगळे थोडे चपापले पण बेत ठरला होता आणि माघार कुणीही घेणार न्हव्ते. प्रातःविधी आटोपून आम्ही आप्लेशिअन मॉउंटन साठी निघालो. सुंदर वनराई, थंडगार वारा, मधेच डोकावणारे सूर्यकिरण, हवेमध्ये भिनलेला पहाटेचा सुंदर सुगंध, सगळे काही इतके सुंदर होते की वर्णन करण्यास शब्द नाहीत...............

ठरलेल्या जागी म्हणजे आप्लेशिअन मॉउंटनला  (Appalachian Mountains, NC, USA) आम्ही पोहचलो आणि सगळी उपकरणे घेवून स्की करण्यासाठी म्हणून पुढे सरसावलो. कुणालाच स्की करण्याचा अनुभव न्हवता म्हणून सगळ्यात छोट्या ट्रेलवर स्की करण्यावाचून पर्याय न्हवता, सगळ्यांना आता लाज वाटू लागली कारण त्या छोट्या ट्रेलवर सगळी ५ ते १० वर्षाची मुलेच दिसत होती.सगळ्यांनी तिथे दुर्लक्ष केले आणि लाज सोडून आम्ही त्या ट्रेलवर स्की साठी गेलो.
टिम स्की (अर्धी)
आदळण्या पूर्वी मी
बर्फावर उभे रहाणे किती कठीण असू शकते याची प्रचीती आम्हाला आली. पहिला मित्र स्की करण्यासाठी म्हणून गेला आणि तिथेच पडला,दुसरा गेला तो सरळ जावून एका व्यक्तीच्या पायांमध्ये अडकला आणि त्याला घेवून पडला. मी पण शक्ती एकवटून ट्रेलवर स्की घेवून आलो थोडावेळ बऱ्यापैकी स्की करून मी देखील बर्फात आदळलो.शेवटी चौथा मित्र छान स्की करत शेवट पर्यंत आला आणि थांबला. आता त्या छोट्या ट्रेलवर आम्ही कब्जा केला होता सगळेच धडपडत होतो पण मजा करत होतो. बाकीचे ४ मित्र देखील आले. सगळे इथे तिथे पडत आहेत बघून आमच्यातल्या एकानेतर स्की करण्याचा बेतच रद्द केला. मला हे जमणार नाही म्हणून त्यांनी एवढा खर्च करून देखील स्की न करण्याचा निर्णय घेतला. त्याने का असे केले असावे ह्याचा साधारण अंदाज तुम्हाला हि चित्रफित (Video) बघून येईल. माझा मित्र स्की करताना :Pतेवढ्यात ज्या मित्राला जरा चांगले स्की जमत होते तो म्हणाला "या लहान मुलांच्या ट्रेलवर स्की करण्यापेक्षा मी मोठ्यालोकांच्या ट्रेलवर जातो.  कुणी येणार का ?" त्याच्या या प्रश्नाला कुणीही हो म्हंटले नाही, शेवटी तो एकटाच त्या ट्रेलसाठी निघून गेला. बाकी सगळे त्या लहान मुलांच्या ट्रेलवरच समाधानी होते. बर्फातला तो अनुभव खूप म्हणजे खूप छान होता.
थोड्याच वेळाने मोठ्यांच्या ट्रेलवर गेलेला मित्र जरा अवघडलेल्या स्थितीत येताना दिसला, मी थोडा थांबलो आणि त्याला विचारले…
स्की मॉउंटन - मोठ्यासाठी 

  • मी:- काय रे !!!  काय झालं ?
  • मित्र:- अरे काही नाही, सगळे ठीक आहे!
  • मी:- मग मेल्या असा काय चालतो आहेस, पहिल्यांद्या साडी घातलेल्या मुली सारखा?
  • मित्र:- अरे काही नाही, थोडी पँट फाटली आहे. बाकी काही नाही.
  • मी:- पँट फाटली, अशी कशी फाटली, दाखव बघू !
  • मित्र :- अरे नको ,अगदी ढोपरा पर्यंत फाटली आहे. 
  • मी:- मेल्या काय झाले सांगशील ?
  • मित्र:- अरे मी मोठ्यांच्या ट्रेलवर गेलो आणि स्की करण्यास सुरु केले. थोडा खाली आलो आणि मला वेग आवरेनासा झाला. ट्रेलवर येताना एक-दोन लोकांना मी पाडले आणि सरळ दोन्ही तंगड्या पसरून मी एका छोट्या झाडात घुसलो आणि माझी पँट मधल्या सांध्यापासून अगदी दोन्ही पायांच्या ढोपरापर्यंत फाटली.
  • मी (हसू आवारात):- सगळे सामान ठीक आहे ना ?
  • मित्र (चिडून):- हो रे ! तू गाडीची चावी दे मी दुसरी पँट घालतो. 
मित्र रागात दोन्ही पाय जवळ करून गाडीच्या दिशेने निघून गेला. मी बाकीच्या मित्रांना हि गोष्ट सागितली आणि सगळे पोट दुखेपर्यंत हसलो. मित्र पँट बदलून आला आणि स्की न करणाऱ्या मित्रासोबत बसला. मजेची गोष्ट तर विसरलोच !!! हा तोच मित्र आहे ज्याच्या मागे कायाकिंगच्या वेळी कुत्रा लागला होता :P.

सुर्य हळू हळू ढगामागे झाकोळला जावू लागला होता आणि अचानक थोडी बर्फवृष्टी (Snowfall) होवू लागली. सगळेच स्की करून, धडपडून थकलो होतो; म्हणूनच आम्ही निघायचा निर्णय घेतला. बर्फवृष्टी वाढतच होती आणि अचानक वादळ आलेले जाणवले, विजा कडाडल्या, बर्फवृष्टी वाढली.
बर्फाछादित गाडी
बाहेर येवून पहिले तर गाडीवर ३-४ इंच बर्फ साचला होता. रस्ते कळेनासे झाले होते. आम्ही सगळे थोडे चरकलो; पण पुन्हा घरी जाणे भाग होते कारण ह्युस्टनच्या मित्रांना सकाळी विमान पकडायचे होते. गाड्या २० - २५ मिनिटे  गरम केल्या नंतर आम्ही तेथून निघालो. माझा आणि माझ्या मित्राचा बर्फात गाडी चालवण्याचा तो पहिलाच अनुभव होता. रस्ता पूर्ण बर्फाच्छादित होता व आजूबाजूचे खड्डे, रस्त्याचा काठ काहीच कळत न्हव्ते. सगळेच आता घाबरले होते. आम्ही ५ ते १० कि.मी. प्रती तास (kmph) या वेगाने गाडी चालवत होतो. गाडीची चाके सारखी सरकत (skid) होती, रस्त्याच्या कडा सांभाळणे खूप कठीण जात होते. आजू बाजूला गाड्या इथे तिथे खड्ड्यात पडलेल्या दिसत होत्या. मोठ मोठे ट्रक देखील रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत होते. मनातल्यामनात देवाचा धावा करत, जीव मुठीत घेवून आम्ही ५-१० कि.मी. वेगाने घराकडे निघालो होतो.अचानक एक मोठा १६ चाकी ट्रेलर भरधाव वेगाने आमच्या बाजूने गेला आणि त्या ट्रेलर मुळे विस्थापीत बर्फामुळे आमची गाडी रस्त्यावरच ७०-८० डिग्रीने जागेवरच फिरली. सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि हाच आपला शेवटचा क्षण असे वाटून गेले. सगळेच त्या ट्रेलर-वाल्याला शिव्याशाप देवू लागले. जेमतेम गाडी सरळ करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. थोडे पुढे गेलो तेव्हा तो ट्रेलर रस्ता सोडून बाजूला एका खड्ड्यात घुसलेला आम्हाला दिसला, त्याचा चालक बाहेर निघून ते पाहत होता. त्याला पाहत आम्ही पुढे निघालो. गाडी चालवत आता ४ तास झाले होते. जीव मुठीत घेवून सगळेच त्या गाडीत देवाचा धावा करत बसलो होतो. बर्फवृष्टी चालूच होती. विजा कडाडत होत्या आणि या सर्व परिस्थितीत आम्ही सगळे आमच्या आयुष्यातली पहिली बर्फवृष्टी अनुभवत होतो.
साधारण ६ तास गाडी चालवत ९० मैलाचा प्रवास करत कसे बसे आम्ही  घरी पोहोचलो, सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आणि त्या कर्त्या-करिवत्याचे आभार मानून आम्ही घरात शिरलो. घरी येवून सगळे स्थिरावलो थोडे खाल्ले आणि झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी छान उन पडले पण आमच्यातील कुणीही त्या बर्फात जाण्यास तयार न्हव्ते, का ते सांगायला नकोच :). बर्फामुळे सगळी विमाने रद्द करण्यात आली होती, आमचे ह्युस्टनचे मित्र अजून एक दिवस आमच्या इथे राहिले. वातावरण ठीक झाले आणि आमच्या या रोमांचक सहलीची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशीची छान बर्फाच्छादित सकाळ

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes