वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव !!!

माझ्या गोष्टींच्या शीर्षकावरून मी कश्याबद्दल लिहिले आहे हे चटकन लक्ष्यात आले असेलच ? :) 
होय मी होड़ी चालवण्या बद्दलच बोलतो आहे. नेहमी प्रमाणेच मी
"दर्यावरी आमची डोले होरी , घेवून माशांच्या ढोलीन्‌ आम्ही हाव जातीचे कोली"
हे गाणे ऐकत असताना माला माझ्या मित्रासोबत केलेली बोटिंग (नौका विहार ) आठवली आणि मी हसत सुटलो. माझ्या मंडळीना (बायकोला) मी का हसतो आहे हे कळता कळेना म्हणून ती इथे तिथे बघू लागली कुठे काही लागले आहे का म्हणून आणि ते पाहून मी अधीकच हसू लागलो. बायको जास्त रागावणार असे कळताच मी हसू आवरले आणि शांत झालो. मग बायकोने प्रामाणिक पणे विचारले का हसताय ? मग तिला गोष्ट सांगण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नव्हता.……… !!!

चले चलो 
अमेरिकेत असताना प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीत काही-ना-काही उद्योग करायचे,  सरळ मित्रांच्या भाषेत म्हणायचे तर  "किडे करायचे" असा आमचा नियम असायचा. अश्याच एका सुट्टीत आम्ही नौकाविहार (बोटिंग) करायला जावू असे ठरले. माझ्या कडे नियोजनाचा भार नेहमी प्रमाणे होताच आणि मी बोटिंगसाठी जागा शोधणे, तिकिटे काढणे ह्या मधे गुंग झालो. ठरवल्या प्रमाणे "HeadWaters Outfitters" या नॉर्थ कॅरोलिना स्थित कंपनीची मी तिकिटे काढली. आम्ही एकूण ४ मित्र होतो त्यातील दोघांना पोहता येत होते आणि दोघांना नाही. मजेची गोष्ट म्हणजे पोहता न येणाऱ्यांमध्ये एक जातीने कोळी होता :P.
ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी "कनू बोट" आणि पोहता येते त्यांच्यासाठी "कयाक बोट" अशी तिकिटे आम्ही काढली. कनू मधे दोघे बसून ती वल्हवु शकतात आणि सहसा ती पाण्यात उलटी होत नाही. या उलट कयाक चालवायला थोडी कठीण पण मजा जास्त :). आम्ही सर्व बोटिंगच्या तयारी ला लागलो. मी माझ्या साठी नवीन घडयाळ घेतले पाण्यात पण चालू राहील असे (Waterproof). मित्रांने नवीन चप्पल, उन लागेल म्हणून टोपी, थोडा सुका खाऊ, इत्यादी, त्यादी…. 

कनू /कयाक सफारीचा नकाशा

असे करता करता बोटिंगचा दिवस येवून उभा ठाकला आणि सकाळी ठरलेल्या वेळेच्या नंतर एखाद तासांनी आम्ही निघालो, त्याचे कारण नंतर समजले ते म्हणजे आमचे न पोहणारे साथीदार जाण्यासाठी जरा उशीर करत होते! का ते सांगायला नकोच :P.  असे उशीर करत करत आम्ही एकदाचे बोटिंगच्या कार्यालयात जावून थडकलो.  तिथे आमची माहिती घेवून बोटिंग साठीचा नकाशा आम्हाला देण्यात आला. आम्ही जरा आगावू पणा  करून स्वयं-मार्गदर्शित  (Self-Guided) ४ तासांची कयाक आणि कनू सफारी घेतली होती. ज्याचे अंतर १० मैल (१६ किमी) होते. त्या सफारीचा नकाशा बाजूला दाखवल्या प्रमाणे होता. सुरुवात "PUT IN POINT" पासून आणि शेवट दुसऱ्या "TAKE OUT POINT" कडे. 
हे पाहून आम्ही थोडे घाबरलोच पण आता पैसे देवून मोकळे झालो होतो; त्यामुळे काही एक पर्याय शिल्लक नव्हता. 
ठरल्याप्रमाणे आम्हाला काही सुरक्षा नियम सांगण्यात आले, काही छोटे सुरक्षा चित्रपट दाखवण्यात आले आणि सुरक्षा जाकीट देवून आमची रवानगी "फ्रेंच ब्रोड नदीकडे" करण्यात आली. त्यातल्या काही महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे:-
१) जर काही समस्या आली तर नदीच्या बाजूला असलेल्या घरातून कार्यालयात संपर्क करणे. (पुढील काळजी कंपनी करेल)
२) कनू / कयाक चालवताना जर कुठे नदी वळत असेल तर प्रवाहाच्या दिशेने झोक द्यावा.
प्रवाहाच्या दिशेने झोक द्या, त्यामुळे कयाकला
तरंगण्यासाठी जास्त पृष्ठभाग मिळेल

आपला मेंदू हे करण्यास तयार होत नाही; ह्या गोष्टी सरावानेच येतात असे देखील सांगण्यात आले.  इंग्रजी मधे "Lean into Flow Direction, if you leaned away from Flow Direction water will get into Kayak ". बाजूच्या चित्रात मला काय सांगायचे आहे हे चित्र रुपात दाखवले आहे. अधिक माहिती साठी कयाकिंग करणे गरजेचे आहे :P 


अश्या सगळ्या जय्यत तयारी नंतर आम्हाला कयाक आणि कनू देण्यात आल्या. आमचे न पोहणारे साथीदार पुढे जावूदे म्हणजे काही मदत लागली तर आम्ही करू शकतो असे म्हणून आमच्या मधील दोघे कनू मधे बसले आणि काही एक बोलायच्या अगोदर कनू प्रवाहाच्या दिशेने वेगाने जावू लागली. सहलीचा पहिला टप्पा पार पडला. "वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव" असे म्हणत आमच्यातील दोघे मार्गस्थ झाले. आता कयाक घेवून आम्ही सज्ज होतोच, माझा मान पहिला म्हणून मी कायक मधे बसलो आणि कयाक पुढे पुढे जावू लागली आणि एका खडकात अडकली मी ती तिथून काढायचा प्रयत्न केला पण ती काही निघेना. याच दरम्यान माझा मित्र देखील कयाक  मधे बसून निघाला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे एका जागी कयाक स्थिर ठेवणे कठीण जात होते. तो माझ्याकडे बघत असतानाच माझी कयाक खडकातून निघाली आणि तो पाण्यामध्ये पडला. आमच्या दोघांमध्ये ३० ते ४० फुटांचे अंतर असेल. गार गार पाण्यात त्याची छान आंघोळ झाली होती. पुढे आम्ही जेमतेम स्थिरावलो आणि आमचे कयाकिंग सुरळीत चालू झाले. नदीमधे मधेच खूप उथळ प्रवाह, मधेच शांत नितळ पाणी, मधेच काठावरची वाकलेली झाडे, मधेच पक्ष्यांचा आवाज असा छान पैकी नौका-विहार चालू होता.  मधेच एका ठिकाणी नदीच्या पत्रात झाड उन्मळून पडले होते, मग कयाक मधून उतरून कयाक उचलून पुन्हा नदीच्या पात्रात सोडावी लागली पण एकंदरीत नौका-विहार सुरळीत चालू होता :)

मी - कयाक सोबत
आमच्यातले दोघे कनू घेवून एव्हाना बरेच पुढे गेले असावेत कारण त्यांचा काही थांग पत्ता दिसत नव्हता. माझा दुसरा मित्र देखील आता माझ्या सोबत नव्हता, पाण्यात पडल्यामुळे तो देखील थोडा पिछाडला होता. असाच शांत नौका-विहार चालू असताना मला पुढे वळण दिसले, मी मनातल्या मनात "Lean into the Flow, Lean into the Flow, Lean into the Flow " असे म्हणण्यास चालू केले. जेव्हा मी वळणावर आलो तेव्हा माझ्या मेंदूने दगा दिला आणि मी बरोबर जे सांगितले होते त्याच्या उलटे केले  आणि माझ्या कयाकमधे पाणी भरले व मी पाण्यात पडलो. सोबात आणलेला रुमाल व खायला आणलेली बिस्किटे पाण्यात वाहून गेली. तरी नशिब मी पायात सँडल्स घातले होते जे वाचले. मग जेम-तेम स्वतःला आवरत माझी कयाक नदीकाठी खेचली, हातातले वल्हे त्यावर ठेवले. कयाक उलटी करून सगळे पाणी काढून टाकले आणि पुन्हा कयाक पाण्यात टाकून माझा पुढचा प्रवास चालू केला. साधारण चार  - सव्वा चार तासाने मी Take Out Point कडे पोहचलो , जिथे माझ्या स्वागतासाठी माझे न पोहता येणारे साथीदार होतेच :)
कयाक मधून निघताना खूप शर्थ करावी लागली, पाय आखडलेले वरून किनारा थोडा खोल, कसा बसा मी किनाऱ्यावर उतरलो आणि कयाकिंगचा बेत फत्ते झाला. आम्ही तिघे आता आमच्या चौथ्या मित्राची वाट पाहू लागलो, ५ तास झाले काही पत्ता नाही ६ तास होत आले तरी ह्याचा पत्ता नाही. आम्हाला आता काळजी वाटू लागली तितक्यात आम्हाला न्यायला कंपनीची गाडी आली आणि त्याने सांगितले कि चौथा मित्र पोहोचेलच आता !!! हे ऐकल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. तब्बल साडे सहा तास कयाकिंग करून आमचा मित्र समोरून येत होता. तो किनाऱ्याजवळ आला पुन्हा एकदा धडपडला आणि किनाऱ्यावर उभा राहिला. पायात चप्पल नव्हती, डोक्यावर टोपी नव्हती आणि सगळे कपडे ओले चिंब. आम्ही  विचारले "मेल्या केलेस तरी काय एवढे" नंतर त्याने त्याची गोष्ट सांगितली…. 

कयाकिंग करणारा माझा मित्र :-तुम्ही पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी वळणावर मी धडपडलो, कयाक मधे पाणी घुसले. कयाक सांभाळेपर्यंत चप्पल वाहून गेली, मग हातामध्ये कयाक आणि वल्हे तेवढे शिल्लक होते. टोपी देखील केव्हाच वाहून गेली होती. मग कयाक पुन्हा पाण्यात टाकताना पाय घसरला आणि कयाक पण वाहून गेली आणि हातात फक्त वल्हे तेवढे राहिले. शेवटी कंटाळून रागाने तिथेच बसून राहिलो.

काय करू काय करू या विचारात असतानाच किनार्यावरील कुणालातरी विनवणी करून फोन करावा असे सांगितले होते ते आठवले. मग मी अनवाणी हातात वल्हे घेवून एका घरापाशी आलो आणि दाराची घंटा वाजवली. कुणी आले नाही मग मी दुसऱ्या घरी गेलो तिथे पण तेच.

शेवटी एका घरामध्ये जाळीचा दरवाजा होता ते पाहून माझ्या जीवात जीव आला. दाराची घंटा वाजवली आणि जाळीच्या दारामधून एक शुभ्र-वर्णाची सुंदर मुलगी बाहेर येत असताना दिसली, जिने मला पाहिले आणि घाबरली. घाबरून मला "Go Away , Go Away " असे बोलू लागली. मी सांगण्याचा प्रयत्न केला की मला एक फोन-कॉल करायचा आहे पण तिने तिचा कुत्रा माझ्या अंगावर सोडला आणि मला पळता भुई थोडी झाली ………………. बिन चपलेने मी गवतात कसा धावलो ते माझे मलाच माहिती. धावत थोडे पुढे गेल्यानंतर कुत्र्याचा आवाज बंद झाला व आजू-बाजूला गाड्यांचा आवाज यायला लागला, मी धावतच त्या दिशेने गेलो. ज्या रस्त्याने आपण आलो तोच हा रस्ता होता. एक दोन गाडी वाल्यांना हात केला पण माझा अवतार बघून कुणी थांबेना…पायात चपला नाहीत, हातात वल्हे , केस विस्कटलेले, कपडे भिजलेले ……………असो. माझ्या या दयनीय परिस्थितीला बघून एका गाडी वाल्याला दया आली आणि त्याने गाडी थांबवली. त्याचा भ्रमणध्वनी (सेलफोन) घेवून मी कार्यालात फोन लावून मी कुठल्या ठिकाणी आहे ते सांगितले. कार्यालातील कर्मचारी लगेच गाडीतून दुसरी कयाक घेवून आला आणि पुन्हा माझा नौका-विहार सुरु झाला. नंतर इथे पोहचे पर्यंत तसा त्रास झाला नाही पण उतरताना शेवटची आंघोळ काय ती झालीच. :P

हे सगळे  ऐकले आणि आम्ही एवढे हसलो- एवढे हसलो की सांगायची सोय नाही……!!!


हे सगळे संपवून आम्ही हसतच पुन्हा घरी आलो आणि जेवून झोपी गेलो, आज देखील ही आठवण आली की मी हसत सुटतो… पण ईश्वर कृपेने सगळे सुखरूप घरी आलो हे नशीब  !!!आता म्हणा ……
दर्यावरी आमची डोले होरी ।
घेवून माशांच्या ढोलीन्‌ आम्ही हाव जातीचे कोली ।

हि गोष्ट महाराष्ट्र टाईम्स मध्ये २४ मार्च २०१५ च्या मुंबई टाईम्सला प्रकाशीत झाली आहे. 
पहा पुढील लिंकवर - मुंबई टाईम्स 

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes