नेमकी वेदना तीच वाचे ग़ज़ल.………

गीत गुंजारते जीवनाचे -"ग़ज़ल", मर्म हृदयातल्या स्पंदनांचे -"ग़ज़ल"
भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे "ग़ज़ल"

भावनांची अभिव्यक्ति (Articulation) ही मानवी मनाची नितांत गरज आहे आणि अभिव्यक्तिचे एक सशक्त माध्यम आहे ते म्हणजे "ग़ज़ल".

कॅसेट कवर (ध्वनिफितीचे मुखपृष्ठ)
हे स्वर आमच्या घरात तरळले आणि नेहमीच निनादु लागले कारण बाबांनी "गझल नवाज भीमराव पांचाळे " यांची "एक जखम सुगंधी" ही ध्वनिफित (कॅसेट) आणली होती. आता नक्की कुठल्या वर्षी ते नीट आठवत  नाही पण मी इयत्ता ८ वी किंवा ९ वी मधे असेन. छान गडद पिवळा रंग आणि गाण्यात पूर्ण तल्लीन एक रेखाकृती असलेले ध्वनिफितीचे मुखपृष्ठ होते (कॅसेट कवर) .
पहिल्यांदा जेव्हा कॅसेट घरात ऐकली त्या  वेळेला माझा परिचय मराठी ग़ज़लशी झाला, आणि माझ्या आवडत्या गायकांच्या यादीत अजुन एक नाव वाढले ते म्हणजे "ग़ज़ल नवाज भीमराव पांचाळे" यांचे. सगळ्यांच्या माहिती साठी त्यांना प्रेमाने "दादा" ह्या नावाने ओळखतात :)
दादांनी ग़ज़ल गावी आणि तीची कळ अगदी काळजात जावी हे काही नविन नाही पण तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांना ती एक मेजवानीच म्हणावी लागेल. १६वे वर्ष म्हणजे आयुष्यातले महत्वाचे वर्ष जेव्हा खरी गरज असते ती  भावना व्यक्त करण्याची आणि वर लिहिल्या प्रमाणे "नेमकी वेदना तीच वाचे ग़ज़ल" ही संधी ग़ज़ल मुळे सहज उपलब्ध झाली, म्हणजे "माकडाच्या हातात कोलीत " असेच म्हणावे लागेल.  बरोबर ना ? ;)

या कॅसेट मधल्या सगळ्या गज़ल्स अगदी तोंडपाठ होईपर्यंत मी  ऐकल्या आणि जेथे चान्स मिळेल तिथे गाउन भाव खाल्ला :P "तुझा  तसाच गोड़वा असेलही नसेलही" असो किंवा "मी किनारे सरकताना पाहिले" नाहीतर "आयुष्य तेच  आहे, अन हाच पेच आहे" असो. ग़ज़लचा प्रतेक शब्द अगदी समजुन  उमजून बांधलेला, ग़ज़लला  "शब्दप्रधान गायकी" असे का ओळखले जाते ते मला या ग़ज़ल्स मुळे कळाले असे  म्हणण्यास काहीच हरकत नाही. याच कॅसेट मधील पहिल्या ग़ज़लचे शब्द किती खोल विचारांचे आहेत जे या शब्दप्रधानतेचे उत्तम उधारण आहे असे मला वाटते  - " अंदाज आरशाचा वाटे  खरा  असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा". त्यातली आवडती ओळ म्हणजे "काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा !"ह्याच ध्वनिफिती मधील "तु  नभातले तारे माळलेस का तेव्हा, मझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा" या ग़ज़ल ने मनात सर्वाधीक घर केले. "सुरेश भटांच्या" सिद्ध लेखणीतून साकारलेली ही ग़ज़ल आणि तितक्याच सवेंदनेने बांधलेली चाल ही या ग़ज़लची खासियत. ज्यांना मराठी कळते त्यांना ही ग़ज़ल आवडणार यात काही दुमत नाही पण ज्यांना मराठी कळत  नाही तसेच जे हिंदी भाषिक माझ्या शेजारी राहत त्यांनाही ही ग़ज़ल अतिशय आवडली. मी  शाळेतून आलो की माझ्याकड़े ही ग़ज़ल लावण्याची फ़र्माइश व्ह्यायची आणि घरी ग़ज़ल वादनाचे सत्र अविरत चालु  असायचे. पुढे नविन नविन कॅसेट, सीडी, डीवीडी माझ्या ठेवणीत वाढू  लागल्या आणि "दादांचा" श्रोतृवर्ग वाढतच राहिला....... !!!

वेळ कुणासाठी थांबत  नाही तसा तो गेला देखील. माझे दहावी-बारवी, इंजीनियरिंग पूर्ण झाले तरी गज़ल्सची गोडी तीळमात्र ही कमी झाली नाही. पुढे नोकरी  सुरु झाली आणि मला अमेरिकेला जायचा योग आला, घरापासून इतक्या दूर रहायचे, न कुणी ओळखीचे किंवा न कुणी स्वभाषा बोलणारे आणि  त्यावेळेला दादांच्या गज़ल्सनी खरोखरच खुप छान  साथ दिली, धैर्य दिले......... "बोलू घरी कुणाशी, तेही  सुनेच आहे. हाच  पेच आहे, आयुष्य तेच आहे". पुढे ग़ज़ल मधे ओळ  आहे "तु  भेटसी नव्याने, काहे  खरेच आहे" त्यातली तू मला अमेरिकेत सापडली आणि ती म्हणजे माझी उमेद, जगण्याची ऊर्जा. घरापासुन सातासमुद्रा पलीकडे एक अनोळखी देशात एकांतात दिवस काढणे म्हणजे खावु नाही आणि अश्यावेळी एक साथीदार म्हणून साथ केली ती  दादांच्या गज़ल्सनी.

पुढे इतका छान योग जुळून आला की मी बोरीवली मधे घर घेतले जे नकळत का होईना, दादांच्या घरापुसन जवळ आहे, माझ्या बाबांची ओळख त्यांच्याशी झाली आणि एक सच्चा कलावंत, एक नम्र माणुस  मला  जवळून पाहायला मिळाला. त्यात एक सोनेरी संधी चालून आली ती दादांच्या लाइव कार्यक्रमाची. डॉक्टर प्रकाश आमटे  आणि मंदाताई आमटे ह्यांच्या लोकबिरादरी या प्रकल्पाला हातभार लागावा म्हणून "ऋणानुबंध"  हा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतन मधे गुढी पाडव्याच्या दिवशी आयोजित केला होता. या कार्यक्रमात मला माझ्या आवडत्या गज़ल्स नव्या रुपात, नव्या रंगात नविन शेर आणि रुबाया सोबत भेटल्या. खुप वर्ष बाहेरगावी काढली  आणि १०-१२ वर्षांनंतर मी माझ्या साथीदारांना भेटतो आहे आणि हे साथीदार किती बदलले आहेत ह्याची जाणीव मला त्या क्षणी झाली. पुढील चित्रीकरण पाहिले की सगण्यांनाच त्याची प्रचिती येईलच :)ह्या सर्व कार्यक्रमानंतर माझ्या मित्रांची नेहमी एक तक्रार माझ्या कड़े यायला लागली की मी दादांना दारू या विषयावरची ग़ज़ल गाण्यास सांगावे, माझी कधी हिम्मत झाली नाही ही निराळी गोष्ट ;), पण कसे  कुणास ठाऊक दादांच्या पुढच्या कार्यक्रमात पुढील ग़ज़ल त्यांनी गायली.

                                                 "कारणे नाहीत मोठी, यारहो माझ्या पिण्याची"
                                                 "जिंदगी आहे सजा अन गरज आहे झिंगण्याची"या ग़ज़लचे सादरीकरण चालू असताना सभागृहात जो काय उत्साह ओसंडून वाहत  होता तो अवर्णनीय आहे ;) त्यात माझ्या मंडळींचा आवाज तुम्हाला वरील चित्रीकरणात ठळक पणे ऐकू येईल :P

या न त्या अश्या बऱ्याच आठवणी माझ्या गाठिशी आहेत पण सगळ्याच काही लिहिणे शाक्य नाही, पण एक नक्की सांगेन की लाइव कार्यक्रमात जी मजा आहे ती दूसरी कशात मिळणार नाही तर ती  मजा नक्की घ्या :)


भेट एका साधकाशी, गणपती २०१३

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes