Bhavnagari Sabji aka Kande Ghati Bhaji

ब्लॉगचे नाव वाचून थोडे विचित्र वाटले असेल ना? जीवन रक्षक भाजी ? आता हा काय प्रकार आहे ??? असे झाले असेल, हो की नाही ? गांगरून जायचे कारण नाही; हे जीवन रक्षण पुरुषांसाठी  आहे " So rest of the clan can chill"

Kande Ghathe Bhaji

तर जेवणाची आणीबाणी आणी पुरुष हे अतीसामान्य समीकरण आहे. लग्न झालेले असो किंवा नसो पुरुषांच्या आयुष्यात जेवण बनवायची आणिबाणी नेहमीच येते. मी देखील ह्या आणीबाणीला अपवाद नाही. तर झाले असे की ऑफिसच्या कामनिमित्त माला कुवैत देशात जाण्यास सांगितले, साधारण २००७ साल असावे. मी  नेहमीच्या प्रवासाच्या सवयीने सूखा-नाश्ता म्हणून गाठे, कुरमुरे काही मॅगीची १-२ पाकिटें बॅगेत ठेवली होती. प्रवास उत्तम झाला पण रात्री हॉटेलवर पोहोचण्यास उशीर झाला आणि मॅगीची पाकिटें त्याच रात्री संपली, असो.....
दूसरा दिवस मजेत गेला, दुपारच्या जेवणाची सोय कंपनीने केली त्यामुळे काही त्रास झाला नाही. रात्रीच्या जेवणाची सोय माझी मलाच करायची होती. हॉटेल मधले जेवण महाग पड़ते म्हणून मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडताच एका गल्लीमधे खुप सारी हॉटेल्स दिसली, त्यातल्या त्यात एक छानसे हॉटेल बघून मी तिथे स्थिरावलो. तिथल्या वेटरनी माला छान थंड पाणी आणि फ्रेश गार्डन सॅलड़ आणून दिले. एवढ्या वाळवंटात एवढ्या फ्रेश-भाज्या कश्या मिळतात याच विचारात होतो आणि वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला. मी आपले एक वेज-बिर्याणी दे सांगून ती येण्याची वाट पाहत बसलो. वेळ छान चलला होता, अरब देशात जाण्याची तशी पहलीच वेळ होती त्यामुळे मी देखील खुशित होतो. थोड्या वेळाने तो छान गरमा-गरम वाफाऴलेली बिर्याणी माझ्यापुढे ठेवून निघून गेला. माला अशीही भूक लागली होती त्यात छान मोठाल्या भाताच्या दाण्याची-वाफाऴलेली-केसरी-पिवळी बिर्याणी पाहून माझ्या तोंडाला तर पाणीचं सुटलेमी लगबगीने चमचा बिर्याणीमधे रोवला आणि कुठलीतरी भाजी लागावी तसा चमचा थोड़ा अडखळला. मी बटाटा, फ्लॉवर किंवा ढोबळी मिर्ची डोक्यात ठेवून ती बिर्याणी उपसली आणि बघतो तर काय चक्क कोंबडीची तंगडीच उत्खननात सापडली. माला काय करावे समजेना मी वेटरला बोलवले आणि विचारले मी वेज बिर्याणी सांगितली होती, ह्यात तर तंगडी आहे. त्यावर त्याचे उत्तेर मजेशीर होते " साहेब तंगडी बाजुमें करो बाकी सब वेज ही है. " माझी अशी सटकली होती पण करणार काय ? मी निवांत पैसे भरले आणि तिथुन निघून आलो

भूक तर लागली होती आणि हॉटेल मधे जाण्याची हिम्मत होत नव्हती. मी निमुटपणे एका किराणा (बकाला) दुकानावर गेलो आणि रोटी (खूबूस), कांदा, टोमॅटो, मीठ, हळद, मसाला, तेल आणि मोहरी घेवून हॉटेलवर आलो. पुढे काय स्वताच भाजी बनवली आणि पुढचे काही दिवस हे असेच चालू होते ............बऱ्याच देशात अंड , मासे ह्याला माँसाहार म्हणत नाहीत म्हणून थोड़ा त्रास होतो पण स्वतः बनवणार असाल तर काही फरक पडत नाही. असो असे बरेचसे बरे -वाइट अनुभव आले . 

ऑफिस मधून कामानिमित्त बाहेरगावी जाणे हे अगदी नित्य नेमाने चालू होते. बाहेरगावी ३ ते ४ दिवस झाले कि हॉटेल मधले जेवण नकोसे होते. अश्या वेळी घरची चव असलेली भाजी मिळणे जरा कठीणच. बाहेरगावी असल्यावर मी हमखास कांदे गाठे भाजी बनवायचो. हि भाजी रोटी,चपाती, पाव (ब्रेड) आणि वेळ आली तर भाताबरोबर देखील छान लागते. तर जाणून घेऊया हि सोपी भाजी बनवायची रेसिपी.

साहित्य (२ लोकांसाठी):
१) भावनगरी गाठे (२५० ग्रॅम)
२) २ ते ३ कांदे (मध्यम आकाराचे)
३) २ टोमॅटो
४) २ ते ३ हिरव्या मिरच्या
५) हळद,मिरची पावडर, मीठ आणि थोडी साखर
६) फोडणी साठी - गोडेतेल (शेंगदाणा तेल),कडीपत्ता, मोहरी (राई), हिंग , जिरं
७) सजवण्यासाठी कोथिंबीर (आवडत असल्यास)

कृती (वेळ: ४ ते ५ मिनिटं):
१) कांदा, टोमॅटो छान बारीक चीरून घ्या
२) मिरच्या आपणास आवडतात त्या प्रमाणे बारीक चिरून किंवा २ तुकडे करून घ्या
३) एका पसरट  कढई मध्ये २ ते ३ टेबल स्पून तेल तापवून घ्या
४) तेल छान गरम झाले की त्यात फोडणी साठी चिमूट भर हिंग, मोहरी (तडतडे पर्यंत),जिरे, कडीपत्ता टाका
५) फोडणी थोडी तडतडली की पुढे हिरव्या मिरच्या आणि कांदा आणि थोडे मीठ टाका (नेहमी पेक्षा कमी मीठ वापरा कारण गाठ्यामधे मीठ असते) - कांदा छान परतून घ्या
७) आता टोमॅटो , हळद , लाल तिखट (लाल मिरची पावडर ) घालून मिश्रण थोडे एकजीव करून घ्या
८) या मिश्रणात २ चिमूट साखर (भाजीत साखर वापरत असाल तरच ) एक कप भर पाणी टाकून टोमॅटो शिजे पर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे शिजूद्या, नंतर विस्तव बंद करून थोडे थंड होऊद्या
९) आता भावनगरी गाठे घालून मिश्रण एक जीव करून घ्या आणि छान कोथिंबीर घालून भाजीचा आस्वाद घ्या

तर अशी ही भावनगरी कांदे गाठे भाजी मला नेहमीच कामी आली आहे. बाहेरगावी जाताना २ पाकिटे भावनगरी गाठे माझ्या बॅग मधे नेहमीच असतात.

(:  तर बघा आजमावून !!! आवडतेय का ? :)


Follow us on Instagram to stay in touch

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes