साई बाबांचे बोलावणे !!!

मित्रांनो असं म्हणतात की साईंचे बोलावणे आल्या शिवाय शिर्डी दर्शन होत नाही, आणि बोलावणे आले असेल तर कितीही अडचणी आल्या तरी बाबांचे दर्शन मिळाल्या खेरीज राहत नाही. माझ्या आणि मित्रांच्या बाबतीत काहीसे असेच घडले त्याची हि गोष्ट. 

केळवे पुलनाका हा माझा आणि मित्रांचा आवडता अड्डा. संध्याकाळी माझे सगळे मित्र कामावरून/महाविद्यालयातून आलो रे आलो की केळव्यासाठी पळ काढायचो. तिथेच बसून आम्ही बरेच बेत केले आहेत. माझी पहिली विमान सफर देखील इथेच ठरली होती. असो.... त्या दिवशी देखील आम्ही घाई गडबड करीत दुचाकी घेऊन केळवे पूलनाक्यासाठी पळ काढला. साधारण पावसाळा संपून थोडे दिवस झाले असावेत, छान गार वातावरण होते आणि आम्ही गरमागरम वडापाव आणि तृप्त मसाला सोड्यावर ताव मारत होतो. शुक्रवारचा दिवस असल्यामुळे आम्ही अगदी निवांत होतो कारण सर्वांना पुढे दोन्ही दिवस सुट्टी होती.केळवे पुलनाका- गरमागरम वडापाव आणि तृप्त मसाला सोडा 

अचानक एका मित्राने विषय काढला: "काही तरी करायला पाहिजे ! दोन दिवस काय करायचे?" त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्याने प्रस्ताव मांडला: "चला शिर्डीला जाऊ!" पुढे काय झाले असेल सांगायला नकोच... आम्ही सगळ्यांनी तो प्रस्ताव मान्य केला. आता जायचे नक्की झाले मग पुढचा प्रश्न सोडवायला घेतला... जायचे कसे ? आमच्या सफाळे गावातून थेट शिर्डीला जाण्याची काही एक सोय नाही, गाडी भाड्याने घेण्यासाठी पुरेसे पैसे सगळ्यांकडे मिळून देखील झाले नसते. मग एका मित्राला आठवले कि सफाळे - नंदुरबार एस.टी. आहे जी नाशिक वरून जाते. मग काय दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि आम्ही शिर्डीच्या तयारीला लागलो. मी साधारण अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात असेन, त्या वयात असे निर्णय घेणे म्हणजे नेहमीचेच कारण अभ्यास सोडून कसलीच जवाबदारी नव्हती. कसलाही विचार न करता काहीतरी करत सुटायचे. असो, सकाळी ७ ची एस.टी. होती म्हणून सगळे आपापल्या घरी निघालो. घरी दोन महत्वाची कामे होती १. घरच्यांची परवानगी आणि २. शिर्डी साठी पैश्यांची मागणी. मी घरी जाऊन परवानगी मागितली आणि थोड्या उपदेशानंतर मला पैसे आणि परवानगी दोन्ही मिळाल्या. मग काय ३ कपडे पिशवीत भरले आणि शिर्डी साठी माझी तयारी झाली.

सकाळी ठरल्या प्रमाणे आमची चांडाळ चौकडी एस.टी. स्टँडवर भेटली आणि लगबगीने एस.टी. मधे चढत आम्ही जागा बळकावली. आमच्यातील एकाने खूप कष्ट करून खिडकीची जागा बळकावली. थोड्या वेळातच गाडी पूर्ण भरली आणि आम्हाला "चिंतू उस्ताद" दिसला. हा चिंतू उस्ताद म्हणजे माइकल शूमाकरचा बाप. जेवढे स्टंट माइकल शूमाकरला येत असतील ते सर्व हा एस.टी. चालवताना करतो. आम्ही एकमेकांकडे बघून काही बोलणार तेवढ्यातच आम्हाला कळून चुकले कि आज आपली एस.टी. चिंतू चालवणार आहे. थोडा धसका बसला पण काय करणार जायचे ठरलेच आहे. आम्ही सगळे जीव मुठीत घेऊन त्या एस.टी. मध्ये बसलो होतो आणि चिंतुने एस.टी. चा ताबा घेतला. थोड्याच वेळात आम्ही वाऱ्याच्या वेगाने नाशिक कडे निघालो. कुणी एका मुर्खाने सांगितले होते की एस.टी.मध्ये पुढे बसा म्हणजे त्रास होणार नाही आणि आम्ही शतमूर्खा सारखे एस.टी.च्या दारा बाजूच्या सीटवर बसलो होतो. आता विचारा का? कारण - ज्या लोकांना वांती (ऊलटी ) येते ते बऱ्याच वेळा एस.टी. च्या दाराजवळ वांती करतात आणि त्यात चिंतू उस्ताद म्हणजे झालेच.

एस.टी. वेडी-वाकडी वळणे घेत जव्हारच्या दिशेने निघाली होती. जव्हारच्या काही खेड्यातून प्रवास करत ती नाशिकला पोहोचणार होती. जव्हारचा घाट आणि चिंतू उस्ताद म्हणजे बायकांच्या वांत्याची पुष्टी. घाट सुरु झाला आणि एस.टी. मध्ये "वॅक-वॅक "चे आवाज सुरु झाले. थोड्याच वेळात पूर्ण एस.टी. भर दुर्गंध पसरला. आम्ही वांती न येण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या पण मळमळ नशिबी होतीच. कसला अनुभव होता, काही लिहायला नको त्या बद्दल. असो, त्यात ज्याने कष्ट करून खिडकी मिळवली होती तो घाटातील डोंगर आणि दऱ्या बघून घाबरला कारण दरीच्या एकदम कोपऱ्या-कोपऱ्यावरून कट मारत चिंतू भरधाव वेगाने एस.टी. चालवत होता. कुणीही घाबरेल असाच तो रस्ता आणि तो क्षण होता. आम्ही थोडे हिरमुसलो पण बाबांचे बोलावणे त्यामुळे आमच्यातील कुणीच खचलं नव्हत. शेवटी, घाट संपला आणि जव्हारच्या एस.टी. आगारात गाडी थांबली. आम्ही थोडे पाय मोकळे केले पण दुर्गंधी मुळे कुणाचीच काही खाण्याची ईच्छा झाली नाही. शेवटी बिस्कीटचे पुडे घेऊन आम्ही पुन्हा एस.टी.त बसलो. एस.टी. त्याच भरधाव वेगाने चालली होती, साधारण ४ तास झाले तरी नाशिकचा पत्ता नव्हता. सकाळ पासून काही खाल्ले नव्हते, एस.टी.त बसलो होतो पण जीव मुठीत घेऊन, एस.टी.चा प्रवास वांती मुळे दुर्गंधी झालेला आणि ह्या सगळ्यात "खाज"मिटली असे बोलत आम्ही मुकाट पणे प्रवास करत होतो. आणखीन २ तास झाले आणि एस.टी. इंधन भरण्या साठी म्हणून थांबली - आम्ही विचारले अजून किती वेळ लागेल ? तेव्हा कळले अजून २ ते ३ तास जातील कारण एस.टी. अजून एका गावात जाऊन मग नाशिक साठी निघणार. हे ऐकताच आम्ही चिंतू उस्तादच्या विमानातून खाली उतरण्याचा निर्णय घेतला कारण हे सगळे सहन शक्तीच्या बाहेर होते. आम्ही महा-मार्गावरील पेट्रोल पंपवरच उतरलो. कुठलं गाव होते ते आठवत नाही पण पुढील प्रवासासाठी गाडी शोधणे हा नवीन उद्योग आता मिळाला होता. 

गाडी शोधण्याचे काम चालू असतानाच एस.टी.ची २x२ निमआराम एशियाढ गाडी समोरून येताना दिसली, मनात आले अशीतरी गाडी मिळायला हवी होती. का कुणास ठाऊक साई बाबांनी अगदी ठरवून ती गाडी आमच्याच साठी पाठवली होती असे वाटून गेले कारण ती थेट शिर्डी गाडी होती आणि आमच्या खिशाला परवडणारी होती. आम्ही थोडे सुखावलो आम्ही लगबगीने तिथे गेलो, नशीब एवढे चांगले होते की तिथे काही लोक उतरली आणि आम्हाला चौघांना छान बसायला जागा मिळाली. इंधन भरून आम्ही महामार्गाला लागलो आणि शिर्डीच्या ओढीने अगदी सुखावून गेलो. आता दुर्गंधी गेली होती, छान वारा येत होता, बसायला चांगल्या सीट होत्या सगळे कसे जुळून आले होते. 

सायंकाळी साधारण ५ च्या सुमारास आम्ही शिर्डी मध्ये पोहोचलो आणि पुढचा प्रश्न पडला आता रहायचे कुठे? मग काय - लागलो उत्तराच्या शोधात. कुठे काही मिळत नाही असे कळले आणि मन व्यथित झाले. आता काय करायचे असे विचार करत असतानाच समोरून एक माणूस विचारात आला:  "रूम पाहिजे काय ? रूम?"
आम्ही लागलीच त्याच्या मागे मागे गेलो त्यांनी आम्हाला एका ३ स्टार हॉटेल समोर आणून उभे केले. हॉटेल बघून आम्ही जरा चाचरलो आणि मनात म्हंटले आता पैश्याचं काय? पण पुन्हा विचार केला बाहेर कुठे काही मिळत नाही आहे तर विचारून बघू  मग काय ते ठरवू. हॉटेलच्या व्यवस्थापकाला आम्ही विचारले, एका रूमचे किती पैसे होतील आणि आम्ही चौघे त्यात राहू शकतो का? आमचे चेहरे बघून त्यांना अंदाज आला असावा की जास्त पैसे नसावेत. त्यांनी तिथले दर आम्हाला सांगितले जे परवडतील असे नव्हते पण अजून एक उपाय सुचवला की एक "हनिमून सूट" आहे जिथे गरम पाण्यासाठीचा नळ दुरुस्ती साठी गेला आहे तुम्हाला चालणार असेल तर तो रूम तुम्हाला ७५०/- मध्ये एका रात्री साठी देऊ शकतो. आम्ही लगेचच त्यासाठी होकार दिला. पैसे भरले आणि किल्ली घेऊन आम्ही पुढे निघालो. 

किल्लीने दरवाजा उघडला आणि समोर छान शृंगारीक सजवलेली खोली नजरेस पडली. सगळे नीट नेटके आणि सुखकर होते. दोन भिंतींना लागून एक मोठा चतकोर आकाराचा बेड होता. दुसऱ्या बाजूस एक छोटा सोफा आणि टेबलं होते. एक गोष्ट सोडली तर सगळे लहानसे होते - का ते सांगायला नकोच :P. पण त्याचाच आम्हाला फायदा झाला. आम्ही चौघे त्या बेड वर उताणे पडलो, सकाळ पासून जो काही द्राविडी प्राणायाम केला तो संपला होता आणि बाबांच्या दर्शना साठी आता काही काळच उरला होता. 

थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही मंदिरात जाण्यासाठी तयारी सुरु केली. रूम मध्ये एकच बाथरूम असल्या कारणाने नंबर लावणे आले. मी सर्वांआधी उठलो आणि बाथरूम मधे गेलो. बाहेर मित्रांची मस्ती चालूच होती. आरडा-ओरडा, एकमेकांना लाथा मारून बेड वरून पाडण्याचे प्रयत्न आणि चिडवा-चिडवी. अचानक मला आवाज आला:

मित्र १: अमित लवकर निघ  मला जोराची लागली आहे 
मित्र २: अमित नको निघूस , हा मस्करी करतो आहे 
मित्र १: अमित लवकर निघ प्लीज, मी जास्त वेळ काढू शकत नाही 
मित्र ३: अमित नको निघूस , हा इथे नुसता बेडवर  पडून ओरडतो आहे 
हे थोडावेळ चालू राहिले आणि शेवटी
मित्र १: अमित बाहेर निघ , मला आता कळ सोसत नाही आहे . बाहेर निघाला नाहीस तर बघ , मी आता  तुझ्या बुटातच  करेन. मग मला सांगू नकोस ...... मी नाही थांबू शकत.......... लवकर बाहेर ये 

माझे आटोपले आणि मी दरवाजा उघडला आणि मित्र धावतंच मधे गेला आणि येणाऱ्या आवाजावरून कळले की  तो खरे बोलत होता :P :P :P

 बाहेर आम्ही सगळे हसत सुटलो होतो किती काळ ते आता लक्षात नाही :)

सगळा गोंधळ करत आम्ही साई बाबांच्या दर्शनासाठी गेलो. मंदिरामध्ये भली मोठी रांग होती कारण संध्याकाळच्या धूप आरतीची वेळ झाली होती. जस जशी आरतीची वेळ जवळ येत होती तशी आमची उत्सुकता ताणली जात होती. शेवटी आम्हाला मधे घेऊन रांग थांबवण्यात आली. आम्ही खूप नशीबवान होतो की आम्हाला देवाच्या आरती साठी मधे घेण्यात आले आणि सगळे खाली बसले असताना शेवटी आल्यामुळे आम्हाला कट्ट्यावर बसण्यासाठी मुभा मिळाली. बाबांची मूर्ती अगदी डोळ्यासमोर होती. छान आरती झाली, समाधी दर्शन झाले आणि सर्व कष्टांचे चीज झाले.

दर्शन झाले, प्रसाद मिळाला आता वेळ होती छान जेवणाची, सकाळ पासून केलेल्या धडपडीने सगळेच थकले होते. आता छान जेवण करून गाढ झोपी जायचे असा विचार करून आम्ही समाधी मंदिरातून बाहेर पडलो. बाहेर एका रांगेत भरपूर खानावळी होत्या, त्यातल्या एकात आम्ही गेलो. भूक लागली असल्या कारणाने पटकन काही मिळेल का? असा प्रश्न आम्ही केला. वरण भात लगेच मिळेल असे उत्तर येताच आम्ही वरण-भात मागवला. वरण भात टेबलवर येताच आम्ही तुटून पडलो आणि पहिल्या घासातच सगळा उत्साह गळून पडला. वरण चवीला खूप हळदीमय होते म्हणजे त्यात एवढी हळद होती की ते खाणे शक्य नव्हते. आम्ही तसेच जेवण सोडले आणि हॉटेल रूमवर परत आलो. काय खायचे हा प्रश्न होताच, शेवटी हॉटेल मधून चायनीज नूडल्स मागवल्या - त्या महाग असल्यामुळे ४ जणांनी मिळून २ नूडल्स मागवल्या आणि खाऊन तसेच झोपून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी शिंगणापूरला जाण्याचा बेत शेवटच्या क्षणी केला. हॉटेल रूम मधून आम्ही तयारी करून निघालो पण पुढे कसे काय हे कुणालाच माहिती नव्हते. शेवटी एका भल्या माणसाने सांगितले की पुढून तुम्हाला जीप मिळतील शिंगणापूरला जाण्यासाठी. पुढे आम्ही शिंगणापूरला गेलो, छान शनिदेवाचे दर्शन झाले आणि हो येताना आम्ही मुंबईची बस पकडून मुंबईला आलो आणि ट्रेन पकडून सफाळे गाठले.  झालेल्या सगळ्या प्रकाराने एस.टीचा प्रवास पुन्हा करणार नाही असा काहीसा पण घेऊन आमच्या शिर्डीवारीचा समारोप झाला. 

।।अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगी राज
 परब्रम्ह: श्री सच्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय।।Pic credit: Google
मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes