Ek Tutari-Keshavsut Smarak-Malgund

"एक तुतारी द्या मज आणूनी । फुंकीन मी जी स्वप्राणाने "

वरील ओळी वाचल्यानंतर काही आठवते आहे  काय ?? नसेल आठवत, तर पुढील ओळी वाचा ...... 

वसंततिलका, दिंडी, शार्दुलविक्रीडित, पादाकुलक, अंजनी , अतिशयोक्ती, रूपक, अनुप्रास.......... डोक्यात काही प्रकाश पडला काय ?? 
असो, मराठी माध्यमात शिकलेल्या सर्वांना १९९० च्या दशकात जी काही भीतीदायक स्वप्ने पडली ती वरील ओळीत लिहिलेल्या शब्दांमुळेच. मराठी व्याकरणातील छंद , वृत्त, अलंकार , समास, संधी, जाती, कर्तरी प्रयोग -कर्मणी प्रयोग इत्यादी मुळे किती रात्री जागल्या गेल्यात कुणास ठाऊक!. पादाकुलक छंदातील मला आठवणाऱ्या ओळी किंवा मी पाठ केलेल्या ओळी म्हणजे
"एक तुतारी द्या मज आणूनी 
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदून टाकीन सारी  गगनें 
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने "

ह्या ओळी कविवर्य केशवसुतांच्या "तुतारी" या कवितेतील आहेत. केशवसूत म्हणजे श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याचा एकमेकांशी किंवा इथे काय संबंध? तर सर्वांच्या माहिती साठी कवी केशवसुत हे मुळचे मालगुंड या गावचे. मालगुंड हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात येते आणि गणपती पुळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही कोंकणात आलो की गणपती पुळ्याच्या गणपतीचे दर्शन घेतले नाही असे होत नाही. पण तिथून पुढे जाणे कधी होत नाही. मागच्या खेपेला गणपती पुळ्याहुन जयगड येथील  जय विनायक मंदिरात जाण्याचा योग आला आणि वाटेतच मालगुंड हे गाव लागते. गाडी चालवत पुढे जात असतानाच मला एक पाटी दिसली "कविवर्य केशवसुत स्मारक" आणि अचानक वसंततिलका, दिंडी, शार्दुलविक्रीडित, पादाकुलक, अंजनी , अतिशयोक्ती, रूपक, अनुप्रास ह्या सगळ्यांनी डोक्यात गर्दी केली. मला शाळेच्या मराठी व्याकरणाचे तास आणि केशवसुतांच्या पाठ केलेल्या कविता आठवल्या.... एक तुतारी द्या मज आणुनी, आम्ही कोण म्हणुनी काय पुससी -आम्ही असू लाडके ..... आणि  नकळत मी गाडी स्मारकाच्या दिशेने वळवली. 

कोंकणाची हीचतर खासियत आहे नकळत तुम्ही त्याच्याकडे ओढले जाता. माझ्या "गोमु माहेरला जाते हो नाखवा…" ह्या ब्लॉगमध्ये कोंकण शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केलाच आहे. असो, माझी गाडी स्मारका समोर आली आणि छान झाडांनी वेढलेल्या टुमदार अश्या कोंकणी घराने आमचे लक्ष वेधून घेतले. केशवसुतांचा जन्म हा ह्याच घरातला हे पाहता क्षणी कळून चुकले. इथल्या वातावरणातच मुळी कविता जाणवत होती. कौलारू घर, बाजूला चिर्याचे पन्हाळे, लाल मातीचे अंगण, गर्द हिरवी सावली, परसदारी माड ...... नुसते "वाह" एवढेच काय ते शब्द ओठी आले. तुम्हीच पहा  
मालगुंड येथील केशवसुत स्मारक (जन्म स्थळ )

मालगुंड येथील केशवसुत स्मारक (जन्म स्थळ )

कवी कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंड येथे झाला. पुढे टोपण नावाने म्हणजेच केशवसुत या नावाने त्यांनी प्रसिद्धी मिळविली. त्यांनी एकंदरीत १३२ कविता रचल्या, त्यातील बराचश्या मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमात आहेत. केशवसुतांच्या कविता म्हणजे स्वछंद आणि मुक्त, वर्षानुवर्षे चालत आलेल्या कवितेची पद्धत बदलण्याचे धाडस त्यांनी केले म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असे संबोधले जाते.

मालगुंड येथे आता छान ५० ते ६० गुंठे जागेवर हे स्मारक उभे आहे. केशवसुतांच्या प्रसिद्ध कविता येथे कोरून ठेवलेल्या आढळतील. इथे छान वाचनालय, कवितांसाठी एक दालन आणि अभ्यासून साठी खोल्या आहेत. छान शांत परिसर, कवितेला प्रोत्साहन देणारा निसर्ग आणि केशवसुतांची स्फूर्ती अश्या त्रिवेणी संगमात हे स्मारक आपली वाट पाहत उभे आहे ........ मग येताय ना ?

पाषाणात कोरलेल्या केशवसुतांच्या प्रसिद्ध कविता

पाषाणात कोरलेल्या केशवसुतांच्या प्रसिद्ध कविता

पाषाणात कोरलेल्या केशवसुतांच्या प्रसिद्ध कविता

स्मारकाचा नयनरम्य परिसर


कविवर्य - केशवसुत
(१५ मार्च १८६६ ते ७ नोव्हेंबर १९०५)

येथे कसे याल : मालगुंड, जिल्हा-रत्नागिरी
जवळचे बस स्थानक : गणपती पुळे (२ किमी )
जवळचे विमानतळ : रत्नागिरी (५० किमी )
जवळचे रेल्वे स्थानक : रत्नागिरी (५० किमी )
जवळ असलेली स्थळे: गणपती पुळे गणपती मंदिर, गणपती पुळे समुद्र किनारा, प्राचीन कोंकण संग्रहालय, जय विनायक मंदिर, जयगड किल्ला, जयगड दीपगृह (लाईट हाऊस), स्वामी स्वरूपानंद मठ - पावस.

S.T.  महामंडळाची गणपती पुळ्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे पुढे मालगुंड पर्यंतचा प्रवास स्थानिक वाहनांनी करता येईल अथवा छान चालत देखील स्मारकापर्यंत पोहोचता येऊ शकते.

आणखी माहिती हवी असल्यास ब्लॉगपोस्ट वर कमेंट करावी  :)

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

Comments

Popular posts from this blog

BabyShower or Dohale Jevan Part 1-Customs

Celebrating Baby's First MakarSankranti

Baby Shower or Dohale Jevan Part-2-Games