आषाढी किंवा देवशयनी एकादशी

आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूर वारी, पालखी उत्सव आणि निरंतर हरिनामाचा गजर. महाराष्ट्रामधे आषाढी एकादशी म्हणजे मोठा उत्सव, सगळ्या वाहिन्यांवर पंढरपूरच्या वारीचे, पालखीचे, रिंगणांचे इत्यादींचे चित्रीकरण पूर्ण दिवस चालू असते. हे सगळे पाहून मन अगदी विठ्ठलमय होऊन जाते - खरे ना? पण बऱ्याच लोकांना हे का करतो आहोत? हा प्रश्न पडत असेलच ना? या ब्लॉगपोस्ट मधे या सगळ्यावर माझ्या ज्ञानानुसार प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. कृपया हा पोस्ट मला असलेली माहिती म्हणून वाचावा ही विनंती.... !

आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आषाढी एकादशी म्हणजे वारी, आता वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे यात्रा.
इंग्रजी मधे "Annual Pilgrimage" म्हणतात तेच :). वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी एकादशीच्या साधारण २१ दिवस अगोदर देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या व  आळंदी वरून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होतात. ह्या दोन पालख्यांना नंतर लहान मोठ्या अश्या अनेक पालख्या येऊन मिळतात व "ज्ञानबा-तुकाराम" च्या गजरात नाचत गात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता करतात.
असे सांगण्यात येते की संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी आषाढ व कार्तिक महिन्यात पंढरपूर वारीची सुरुवात केली. असेही काहींचे म्हणणे आहे की संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांनी वारीची सुरुवात केली. असो, वारी काय आहे ते आता आपणाला कळले असेल पण ज्या निमित्ताने ही वारी होते, ती म्हणजे आषाढी एकादशी त्या बद्दल किती लोकांना माहिती आहे कुणास ठाऊक. पुढील परिच्छेदात  (paragraph) त्या बद्दलची माहिती आपणास मिळेल. 

आषाढ महिन्याच्या शुद्ध / शुक्ल पक्षातील ११वा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. पुराणात ह्या एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणून मान्यता आहे. देव-शयन म्हणजेच देव झोपी जाणे अशी त्या शब्दाची फोड आहे. पुराणानुसार जगत्पालक श्री विष्णू या दिवशी ४ महिन्यासाठी पाताळ लोकात क्षीरसागरा मधल्या अंनत शय्येवर निद्रा घेण्यास निघून जातात. अशी मान्यता आहे की ४ महिन्यानंतर श्री विष्णू कार्तिक महिन्याच्या एकादशी दिवशी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी या निद्रा अवस्थेतून जागे होतात .  म्हणून कार्तिकी एकादशीला देवउठनी किंवा विष्णूप्रबोधोत्सव किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशी ते  कार्तिकी एकादशी पर्यंतच्या काळाला चातुर्मास असे संबोधले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मास आरंभ होतो जो कार्तिकी एकादशी पर्यंत पाळला जातो. देव निद्रा अवस्थेत असल्यामुळे कुठलेही धार्मिक विधी करणे या काळात व्यर्ज मानले गेले आहे. 

पुराणात आषाढी एकादशीचे एक अनन्य साधारण महत्त्व आहे, त्या बद्दलची कथा पुढील प्रमाणे .... 
"मांधाता नावाचा एक सूर्यवंशी राजा होता. मांधाता महान, सत्यवादी, प्रतापी आणि दयाळू होता. तो आपल्या प्रजेचा कुटुंबा प्रमाणे सांभाळ करत असे. राज्यात सगळीकडे सुख-शांती आणि सुबत्ता नांदत होती. अचानक एका वर्षी खूप दुष्काळ पडला आणि  प्रजेचे अतोनात हाल सुरू झाले. राजा मांधाता खूप दुःखी झाला आणि यावर काही उपाय आहे काय हे जाणून घेण्यासाठी रानात ऋषीमुनींच्या शोधात गेला. शोधतं शोधतं तो ब्रह्मपुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला. अंगिरा ऋषींना प्रणाम करून राजाने तेथे येण्याचे प्रयोजन सांगितले. दुष्काळाने त्राही-त्राही झालेल्या प्रजेसाठी काही उपाय सांगा अशी विनवणी केली. अंगिरा ऋषींनी राजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले.
राजाने आपल्या सर्व मंत्री गणांसोबत हे देवशयनी एकादशी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने राज्यात सगळीकडे छान पाऊस पडला आणि सगळीकडे सुजलाम-सुफलाम झाले. मानवाच्या आयुष्यामधे सगळ्यात महत्वाचा  घटक म्हणजे पाऊस, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात सुबत्ता येते. अश्या रीतीने देवशयनी एकादशी व्रतामुळे सगळी चिंता-दुःख दूर झाली आणि सगळे मंगलमय झाले."

एकादशीचा उपवास कसा कराल?
एकादशीचा उपवास हा दशमीच्या रात्री पासून सुरू होतो जो द्वादशीच्या सूर्योदयानंतर सोडला जातो. दशमीच्या रात्रीचे अन्न हे सात्विक व मीठ विरहित ठेवणे अपेक्षीत आहे. एकादशीच्या दिवशी फळाहार, कंदमुळं (रताळी - बटाटे) आणि इतर उपवास पदार्थाचा आहार करण्यास मान्यता आहे. उपवास सोडताना कांदा लसूण आहारात नसतील तर उत्तम.

माझ्या माहिती प्रमाणे आषाढी बद्दलचे वर्णन मी येथे केले आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. अजून काही माहिती हवी असल्यास "Comment "करून विचारावी. धन्यवाद !!!

।। बोला पुंडलिक वरदे ~~~ हरी विठ्ठल ।।
।।श्री ज्ञानदेव - तुकाराम ।।
।। बोला पंढरीनाथ महाराज की जय ।।221133_10150173096918467_4008483_o


DSC_0380

DSC_0377DSC_0375

DSC_0374

DSC_0373

219211_10150173097123467_740374_o

204831_10150173097078467_2381702_o

201910_10150173097453467_4080520_o

201674_10150173097028467_5874891_o

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes