मियां तानसेन इन फुल फॉर्म….!!!

मला गाण्याची आवड आहे.  ती अनुवांशिक माझ्या वडलांनकडून आणि आजोबांकडून आली असावी असे म्हणण्यास काही हरकत नाही. शाळेत असताना बाबांनी मला गाण्याच्या शिकवणीला टाकले आणि माझी रागदारीशी ओळख झाली. भूप रागाने सुरुवात करत यमन, खमाज,आसावरी,काफी, भैरवी आणि मालकौंस करत करत माझी वाटचाल सुरु झाली. हळू हळू हि गोष्ट सगळीकडे पसरली आणि जिथे जावू तिथे मला गाणं म्हणण्यासाठी फर्माईशी येवू लागल्या. मलाही त्या फर्माईशी मुळे अर्ध्या हळकुंडाने पिवऴ होता आलं .

आश्याच एका दिवशी मंदिरात मला काहीसा दिव्य अनुभव आला, मंदिरात देवी समोर असताना "बाळा असाच गाण्यात प्रगती कर, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर असेल." मी आजू बाजूला पाहिले पण कुणी दिसले नाही आणि तो आवाज देवीचाच होता ह्यावर माझा विश्वास बसला. त्या क्षणापासून माझे पाय जमिनीवर न्हव्ते. आता माझ्या गाण्यात खूप पॉवर आली होती असे मला जाणवु लागले. शक्ती आली होती म्हंटले तरी चालले असते पण पॉवर म्हंटले कि कसे जास्त ताकद आल्या सारखे वाटते.  मी जास्तीच जास्त रियाज करून माझी संगीत साधना अविरत चालू ठेवण्याची भीष्म प्रतिज्ञाच त्या क्षणी केली.

प्रतिज्ञे प्रमाणे मी पहाटे उठून राग मेघ-मल्हार या रागाचा सराव करण्यास सुरुवात केली आणि मला ढग दाटून आल्या सारखे वाटू लागले. पण जुलै महिना असल्या कारणाने तसे झाले असेल असे म्हणून मी तिथे दुर्लक्ष केले. शाळेची वेळ होत आली होती म्हणून तयारी करून शाळेसाठी निघालो. शाळेत आल्यावर कळले कि आज विज्ञानाचे सर सुट्टीवर आहेत.  त्यामुळे विज्ञानाच्या  तासांत काय मजा करता येईल या विचारात बाकीचे तास कसे संपले ते  कळलेच नाही.

विज्ञानाच्या तासाला मराठीच्या बाई आल्या आणि सगळ्या मुलांनी मी गाणे गावे असे सुचवले. मला अंगावर मुठभर मास चढलेले जाणवले आणि मी उगाच भाव खावू लागलो. मी बाईंना सांगितले बाई मी आता गाणे गाणं टाळलेले बरे कारण मला तंद्री लागते आणि मला थांबवणे कठीण होईल तुम्हाला. मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी मंदिरा मधला क्षण होता आणि सकाळचे दाटलेले ढग होते. "मला थांबवणे कठीण होईल तुम्हाला" या माझ्या वाक्यावर बाई खूप हसल्या आणि म्हणाल्या तू काय तानसेन झाला आहेस काय? सगळी मुले हसू लागली आणि माझा राग अनावर होत आहे हे जाणवताच बाईंनी सगळ्यांना चूप केले आणि मला विनंती केली कि तू आता गाणे गावूनच दाखव.

मी आता थोड्या रागातच मेघ-मल्हार रागावर आधारित गाणे गाण्यास सुरुवात केली.  मी रागाची मांडणी करण्यास सुरुवात केली आणि अंधार दाटून यायला लागला आहे हे मला जाणवले. मला आता कुणाचीच पर्वा न्हवती कारण त्यांनी माझ्यातल्या गायकाला आव्हान दिले होते ज्याला देवीचा आशीर्वाद आहे. गाण्याची सुरुवात झाली आणि त्याला साथ ढगांच्या गड्गडाटाने दिली. गाण्याच्या मधल्या तानेला विजांनी खूप कडकडाट केला आणि पूर्ण अंधारात  धो धो पाऊस पडायला लागला. मी आता पूर्ण तल्लीन होवून राग मेघ-मल्हार वर आधारित गाणे गाण्यात मग्न झालो होतो. वर्गात कुणाचीच मला थांबवण्याची हिम्मत होत न्हवती, कारण जस जसे ते मला हाक मारण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न करत होते तेवढा पाऊस वाढत होता. आजूबाजूला आता पाणी साचू लागले होते. जेवढा मी तल्लीन होवून गात होतो तेवढा पाऊस वाढत चालला होता.

थोड्यावेळाने मला माझ्या पायाला पाणी लागलेले जाणवले पण मला सर्वांची खोड मोडायची होती म्हणून मी गात राहिलो. …… गात राहिलो……… .पाण्याची पातळी आता वाढू लागली होती. पायाजवळ, गुढग्यापर्यंत, कमरे एवढे , छाती पर्यंत, शेवटी गळ्यापर्यंत पाणी आले आणि चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब पडले आणि मला आवाज ऐकायला आला  "मियां तानसेन उठा आता, शाळेला जायचे आहे ना ?" तो आवाज माझ्या आईचा होता. ती हातात पाणी घेवून माझ्या चेहऱ्यावर शिंपडत होती. मी झोपेतून उठलो आणि मियां तानसेन त्या मेघ-मल्हारामुळे झालेल्या धो धो वर्षावात विरघळून गेले.………. 
लालठाणे धबधबा , सफाळे , महाराष्ट्र
मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes