एका अनोख्या सफरीच्या पाऊलखुणा ………!!!

आज गाडीतून गावाकडे जात असताना लहान मुलांचा गोंगाट ऐकु आला..... विमा~न ! विमा~न ! विमा~न !
पाहिले तर सगळी मुले आकाशाकडे बघत सैरा-वैरा पळत होती आणि जोर जोरात ओरडत होती …… विमान! विमान!.
जणु  काही  ते विमान ह्यांच्या हाका ऐकून थांबणार आहे आणि अचानक माला माझे बालपण आठवले……"मी तरी वेगळे काय करायचो ? म्हणून मला माझेच हसु आले" :). बऱ्याच आठवणी दाटुन आल्या आणि कधी मी  त्यात बुडून गेलो माझे मलाच कळले नाही. अशीच एक गोड आठवण म्हणजे माझी पहिली हवाई सफर.

खरे सांगायचे तर या हवाई सफरीचे कागदी नियोजन (पेपर प्लानिंग ) खुप अगोदर झाले होते, ते कसे तोही एक मजेदार किस्सा आहे. तो असा की.......... 

२००३ साली माझे अभियांत्रिकी शिक्षण (इंजीनियरिंग) पूर्ण झाले आणि आमच्याच पदवी महाविद्यालयामधील उपकरणीकरण विभागात (इंस्ट्रूमेंटेशन डिपार्टमेंट) मी सहाय्यक शिक्षक (टीचिंग असिस्टंट) म्हणून रुजू झालो. तसे पाहायला गेले तर माझे महाविद्यालयिन जीवन थोड़े अजुन वाढले पण या वेळेला महाविद्यालयात जाण्याचे माला पैसे मिळणार होते एवढेच :P. माझ्या सर्व मित्रांनी पार्टी (मेजवानी)  साठी तगादा लावला आणि मी तो मान्य करून सर्व मित्रांसोबत पार्टीसाठी म्हणून केळवे पुलनाक्यावर पोहचलो. केळवे पूलनाका म्हणजे आमचा नेहमीचा अड्डा; जिथे आम्ही गरमा-गरम वडापाव, भुजिंग (बारबेक्यू चिकन), तृप्त जीरासोडा यावर यथेच्छ ताव मारला. जशी पोटं भरली तस-तसे नविन-नविन विचार बाहेर पडू लागले - हे केले पाहिजे, ते केले पाहिजे  आणि  या सगळ्यामधे एक गोष्ट सामाइक होती ती  म्हणजे विमानात बसण्याची आणि परदेशी जाण्याची. त्या  दिवशी भरल्या पोटी आम्ही सगळ्यांनी एक पण केला की या जन्मात एकदातरी आपण हवाई सफर करून परदेशी जावुया भले मग नेपाळलाच जावे लागले तरी चालेल. सरते शेवटी आपल्याला फॉरेन रिटर्न  ही पदवी मिळाल्याशी मतलब :P. हा पण करून आम्ही पार्टीची सांगता केली.

महाविद्यालयात दिवस मजेत जात होते पण काहीतरी बदल हवा असे सारखे वाटू लागले आणि एके दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि नविन नोकरीच्या शोधात लागलो आणि हे असेच केले होते !!!हातात नोकरी नसताना मी नोकरी सोडली होती. नोकरीच्या शोधात असताना सहज म्हणून एका मित्राला भेटायला गेलो आणि त्याच्या कंपनी मधे जागा असल्याचे कळाले आणि तिथे लगेचच मुलाखत देवून मोकळा झालो. नशिबाने ती नोकरी मला मिळाली आणि एकही दिवस बिनकामाचा म्हणून घरी बसलो नाही. शुक्रवार २१ एप्रिल, २००६ ला महाविद्यालयात शेवटचा दिवस आणि सोमवार २४ एप्रिलला नविन कंपनीच्या औपचारिकता संपवून मंगळवारी २५ एप्रिल २००६ ला मी माझ्या सध्याच्या नोकरीत रुजू झालो. जेव्हा मला विचारले गेले कुठल्या विभागात काम करायला आवडेल तेव्हा जिथुन बाहेरगावी जायला संधी मिळेल असाच विभाग मी मुद्दामून निवडला :P. 

काही महिने झाले असतील आणि मला दुसऱ्या कंपनीमधुन मुलाखती साठी बोलावणे आले. मी मुलाखतीत उत्तीर्ण देखील झालो आणि पगारावरून माझी घासा-घीस सुरु झाली :). मनात आले ज्या कंपनीमधे आल्यानंतर विमानात बसायचे स्वप्न खरे होणार ही आशा पल्लवीत झाली त्या कंपनीमधे असतानाच एकदातरी विमान सफर व्हायला हवी होती. या विचारात असतांनाच माझ्या महाविद्यालयातील एका मित्राचा फोन आला, तो त्याची गुरगांवची नोकरी सोडून मुंबईला येण्याच्या तयारीत होता. बोलता बोलता माझ्या मनातील विचार मी त्याला सांगितला आणि लगेचच त्यानी भरतपुर पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला जावू असा प्रस्ताव मांडला. तसे बघायला गेले तर आम्ही दोघेही नवखे पक्षी निरीक्षक, नवीनच छंद जोपासलेला;  पण तो बोर्या-बिस्तरा बांधून मुंबईत यायच्या तयारीत आणि मला विमानात बसायची हौस आणि या सगळ्याचा शेवट म्हणजे माझ्या पहिल्या विमान सफरीची मुहूर्तमेध रोवली गेली ……  :)

माझी नवीन नोकरी आणि मित्र राजीनामा देवून बसलेला म्हणून दोघांनाही सुट्टी मिळणे जरा कठीण जात होते, पण विमानात बसायची हौस एवढी दाणगी होती की आठवड्याच्या सुट्टीत म्हणजे शनिवार-रविवार या दोन दिवसात हा कार्यक्रम आटोपायचा असे ठरले. ठरल्या प्रमाणे मी शुक्रवार १२  जानेवारी , २००७  च्या रात्रीचे ९.३० चे दिल्ली तिकिट काढले आणि परतीचा प्रवास रविवार १४ जानेवारी, २००७ च्या रात्रीचा घेतला, जेणे करून कार्यालयात सुट्टी टाकायला नको :P. त्यावेळी माझा महिन्याचा ७५% पगार मी विमान तिकिटासाठी वापरला होता. तिथे माझ्या मित्राने देखील जोरदार तयारी सुरु केली होती - सलीम अलींचे "दी बुक ऑफ इंडिअन बर्डस" खरेदी झाले होते, गुरगांव पासून भरतपूरला जाण्यासाठी ४ चाकी गाडी आणि आणखीन २ मित्र तयार होते :)

सगळे सुरळीत चालू असताना दुधात मिठाचा खडा पडला नाही तर कसे चालेल ? कार्यालयात (ऑफिस) मध्ये मला ८ जानेवारी ते १९ जानेवारी असे दोन आठवड्याचे ट्रेनिंग (प्रशिक्षण) रिलायंस कंपनीतील सदस्यांना देण्यास सांगितले गेले. खरे तर ते त्यांचे वार्षिक उजळणी (रीफ्रेशेर) ट्रेनिंग होते, म्हणजे मला दुप्पट अभ्यास करणे गरजेचे झाले तरी देखील मी माझे मनोधैर्य खचू दिले नाही :P - मनात विचार केला राजीनामा तर देणारच आहे काय फरक पडतो :P 

ट्रेनिंग सुरु झाले आणि शुक्रवारी मी माझ्या साहेबांना सांगितले की मी २ दिवस बाहेर जाणार आहे,
पुढे काहीसे असे झाले
साहेब:- कुठे चालला आहेस ?
मी: - सर गुरगांवला
साहेब: - गुरगांवला का ? आणि कुठे?
मी : - सर मित्राकडे, थोडे काम आहे !
साहेब:- मग सोमवारी ऑफिसला कसा येणार तू ? पोहोचायलाच २ दिवस लागतील ?? ट्रेनिंग कोण देणार ???
मी:- सर मी विमानाने चाललो आहे !
साहेब (आश्चर्याने ) :- २ दिवसासाठीच आणि ते पण विमानाने, काही लग्न वैगरे आहे काय?
मी:- नाही सर थोडे काम आहे म्हणून जातो आहे आणि सोमवारी ऑफिस मधे असेन मी, काळजी करू नका !

शेवट पर्यंत मी का चाललो आहे हे सांगितले नाही, कारण पक्षी बघायला जातो आहे सांगितले तर "ते म्हत्वाचे नाही ट्रेनिंग नीट झाले पाहिजे" असे ते बोलतील अशी भीती होती व विमानात बसायचे आहे म्हणून चाललो आहे सांगितले तर वेडयात काढतील असे वाटले. साहेबांच्या मनात काहीतरी पाल चुकचुकली असे जाणवले पण मला माझे विमान खुणावत होते आणि एवढे संभाषण करून मी विमानतळावर जाण्यास निघालो. विमानात बसण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार होते. वेळ कसा गेला कळलेच नाही; मी विमानतळावर येवून पोहोचलो. स्पाईस जेटच्या रांगेत उभा राहिलो, तिकीट घेतले आणि विमानात बसण्यासाठी सुरक्षा तपासणी करून पुढे निघालो. समोर पाहतो तर विमान काही दिसेना, विमानाचा नंबर बघून पुन्हा रांगेत उभा राहिलो बघतो तर काय एक बस आली आणि सगळे त्यात बसू लागले तसा मी पण बसलो, काही एक कळत नव्हते सिनेमा मधे दाखवतात तसे काही दिसले नाही पण बस एका मोठ्या विमाना समोर आली आणि माझ्या जीवात जीव आला :P . विमानात प्रवेश केला आणि छान सुडोल बांध्याची गौर वर्णाची हवाई सुंदरी समोर आली आणि अगदी आपुलकीने माझे तिकीट बघत मला जागा दाखवू लागली - असेच काहीसे मला अपेक्षित होते हे नक्की, पुढे अजून काही सुंदऱ्या इथे तिथे नाचताना पाहिल्या आणि प्रवासाची छान सुरुवात झाली असे वाटले  :P

विमान भरले, विमानाचा दरवाजा बंद झाला तस-तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. विमान धावपट्टी (रनवे) वर आले आणि त्याची गती वाढू लागली तसा माझ्या पोटात गोळा यायला सुरु झाला - अचानक खूप उंचावरून कुणीतरी फेकून दिले आणि हवेच्या उलट्या दिशेला मी खाली पडत आहे असे काहीसे मला भासू लागले , कानात कुणीतरी खूप दाब देते आहे असे वाटू लागले, मी बहिरा होतो कि काय असे जाणवायला लागले आणि अचानक सगळे शांत झाले खिडकीतून पाहिले तर मी चक्क हवेत होतो. आजू बाजूच्या झोपड्या, मोठाल्या इमारती हळू हळू लहान लहान आणि धुसर होत गेल्या, अजून काही वेळाने फक्त त्यांचा प्रकाश तेवढाच जाणवत होता, नंतर शांत गडद अंधार सगळी कडे पसरला. पोटातला गोळा नाहीसा झाला कानातला दबाव देखील निरवला आणि हवाई सुंदर्यानकडे बघत मला कधी झोप लागली ते कळलेच नाही.….

दिल्लीत उतरताच तेथील बोचऱ्या थंडीने माझे स्वागत केले, विमानतळावर मला घेण्यासाठी मित्र आलाच होता. आम्ही थेट मित्राच्या खोलीवर गेलो, खोलीत ५०० वॅटचे बल्ब कोपऱ्या-कोपऱ्यात लावलेले दिसले, मित्राने सांगितले की गरमी टिकून राहण्यासाठी हे करणे गरजेचे आहे, कारण तापमान चक्क २ डिग्री सेंटीग्रेड होते. घरी पोळी भाजी होतीच ती खाल्ली आणि सकाळी ६ वाजता भरतपूर साठी निघू असे ठरवून आम्ही झोपी गेलो.
सकाळचा गजर झाला आणि मी जेमतेम उठलो, पाण्यात हात घालायला पण नकोसे झाले होते, पण कसे बसे दात घासून प्रातःविधीसाठी प्रसाधन गृहात गेलो तेथील इंग्रजी बैठकीवर "फिक्स्ड जेटस्प्रे " (Fixed Jet Spray ) होता जो वापरला आणि मला "सुन्न होणे" ह्या शब्दाचा खरा अर्थ कळाला. असो ……….....................

आम्ही पुढे भरतपूर गाठले वाटेत पहिल्यांदाच मी मॅक डोनाल्डचा पनीर बर्गर हादडला नंतर वाहन चालकाच्या गावात घरगुती जेवण खाल्ले आणि हॉटेलवर रात्रीचा मुक्काम केला. रात्रीचे जेवण म्हणून बटर चिकन, मटार पनीर आणि रोटीवर ताव मारला. तिखट लागले म्हणून २ डिग्री मधे आइसक्रीम खाल्ले :P आणि रात्री मित्राच्या बासरी वादनात तल्लीन होवून शांत झोपी गेलो. पहाटे उठून पक्षी निरीक्षण केले आणि रात्रीचे परतीचे विमान पकडून मी मुंबईत परतलो.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे साहेबांनी मला केबिन मधे बोलावले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली, कुठे गेला होतास, का गेला होतास, एवढी काय आणी-बाणी होती वैगरे वैगरे (त्यांना बहुतेक मी तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलो असेच वाटत होते). सर्व प्रश्नांचा भडीमार करून झाल्या नंतर अचानक त्यांनी विचारले पासपोर्ट आहे का ? मी हो म्हणताच त्यांनी सांगितले अमेरिकेचा विसा अप्लाय कर तुला ट्रेनिंग साठी तिथे जायचे आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी सगळे काही विसरून अमेरिका वारी साठी सज्ज झालो ११ फेब्रुवारी २००७ ला माझी पहिली वहिली अमेरिकावारी झाली. त्या नंतर जणू मला भिंगरीच लागली आणि आता पर्यंत तब्बल ९ देशांमध्ये मी जावून आलो आहे. आता एवढे सरावाचे झाले आहे की मला कंपनीने पास काढून दिला आहे काय असेच लोक विचारतात, असो पण ह्या सगळ्या भ्रमंतीचे आणि यशाचे खरे श्रेय माझ्या पहिल्या विमान सफरीला ज्यामुळे मी परदेशात भरारी घेतली आणि त्या सफरीसाठी माझी साथ देणाऱ्या माझ्या मित्राला म्हणजेच  - धनंजय पाटील याला :)

भरतपुर पक्षिनिरीक्षण टीम (डावीकडून - उजवीकडे)
अमित सुर्वे, स्वप्नील कांचने , पुष्कर कान्हेरे , धनंजय पाटिल
या सहलीची काही क्षणचित्रे
छायाचित्रण श्रेय-  धनंजय पाटिल

भरतपुर सहलीची काही क्षणचित्रे

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes